
जवळे,- ग्रामपंचायत जवळे येथे नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड काढण्याकरिता विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
एसटी बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अत्यंत उपयुक्त ठरत आहे. बारा वर्षांवरील मुली व महिला भगिनी तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासामध्ये अर्ध्या तिकिटाची सवलत मिळते. तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असल्याने ग्रामपंचायत जवळेच्या वतीने या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पमुळे नागरिकांची गैरसोय टळली असून विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्ड काढण्याचा लाभ घेतला.
यावेळी गावच्या आदर्श सरपंच तथा प्रशासक सौ. वृषालीताई उत्तम शिंदे-पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमाबाबतची माहिती दत्तात्रय लायगुडे व हरिचंद्र शिंदे यांनी दिली.





