सामाजिक

“नवीन स्वप्नांना नवी दिशा, नव्या वाटचालीला नवी आशा”; समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत !!

1010538065

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बांगरवाडी येथे इयत्ता अकरावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

“नवीन स्वप्नांना नवी दिशा, नव्या वाटचालीला नवी आशा” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसोबतच व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्यनिर्मिती, सामाजिक बांधिलकी आणि जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. अनिल पाटील गुंजाळ, माजी सहाय्यक आयुक्त तथा शिक्षणाधिकारी, पुणे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, क्रीडा संचालक मा. एच. पी. नरसुडे, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य वैशाली आहेर यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अकरावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी या कालखंडाचा योग्य उपयोग करून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी सांगितले. मार्गदर्शन करताना श्री. अनिल पाटील गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून स्वतःची ओळख निर्माण करणे, आपल्या क्षमता व कौशल्ये ओळखणे, योग्य ध्येय निश्चित करणे आणि उत्तम चारित्र्य घडविणे आवश्यक आहे, असे सांगितले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्याने प्रथम स्वतःकडे पाहिले पाहिजे आणि स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. आपली आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखून त्यानुसार ध्येय निश्चित करा. स्वतःसाठी तसेच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना मनात निर्माण करा. समर्थ शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेताना स्वतःला खऱ्या अर्थाने सक्षम आणि समर्थ बनविण्याचा प्रयत्न करा.”
यावेळी त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गापासून दूर राहावे, भ्रष्टाचाराला थारा देऊ नये, अंधश्रद्धेला बळी पडू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे, असा संदेश दिला. आई-वडील, शिक्षक आणि समाजातील मान्यवरांचा आदर राखण्याचे आवाहन करत जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक विचारसरणी ठेवून परिस्थितीचा सामना करावा आणि निराश होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची चरित्रे वाचून त्यातून प्रेरणा घ्यावी आणि स्वतःचे चारित्र्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच इतरांशी स्वतःची तुलना न करता आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे, अनावश्यक ताण घेऊ नये आणि “टेंशन फ्री” राहून आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.

अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांना जीवनात विशेष महत्त्व असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना “गतीला अडथळे नकोत, मतीला बंधने नकोत” या भावनेने पुढे जाण्याचे आवाहन केले. श्रमसंस्कृती वाढविणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी कोणतेही काम कमीपणाचे न मानता श्रमाची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. अभ्यासाबरोबरच दररोज किमान एक तास शारीरिक श्रम किंवा व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, असाही त्यांनी सल्ला दिला.

“जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहा; मात्र त्या स्वप्नांना मेहनत, शिस्त, संस्कार आणि योग्य नियोजनाची जोड द्या. चांगले विचार, चांगली संगत आणि चांगल्या सवयी या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार ठरतील,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संगीता रिठे यांनी केले. तर आभार क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संतोष पोटे, प्रा.राजेंद्र नवले व प्रा. विनोद चौधरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अकरावीचे नव्याने प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीने, आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने शैक्षणिक वाटचाल करण्याची प्रेरणा निर्माण झाली.

1010527525
1010527342

Related posts

समर्थ फार्मसी महाविद्यालयांचे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी -तमाशा रंगभूमीवरील खलनायक – दादू राणू गायकवाड

Chief Editor

लोणी (धामणी) येथे नागपंचमी निमित्त भव्य कलगीतुरा सामना उत्साहात संपन्न ; महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंतांच्या सवाल-जवाबांनी रंगला कलगीतुरा; हजारो रसिकांची उपस्थिती !!

Chief Editor

Leave a Comment