
पंचनामा प्रतिनिधी नारायणगाव – महाराष्ट्राच्या लोककला व तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू डॉ. मोहित नारायणगावकर यांची अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषद यांच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
लोककला, तमाशा आणि कलावंतांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याची परंपरा असलेल्या नारायणगावकर कुटुंबातील डॉ. मोहित नारायणगावकर यांच्यावर परिषदेत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तमाशा व लोककला क्षेत्रातील कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तमाशा ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा महत्त्वाचा भाग असून, बदलत्या काळात या कलेसमोरील विविध अडचणी सोडविणे, कलावंतांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणे तसेच लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. मोहित नारायणगावकर यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा लोककलेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता डॉ. मोहित नारायणगावकर यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




