सामाजिक

जीवन प्रवासात एकवेळ “पंगत” चुकली तर चालेल मात्र “संगत” चुकायला नको…!!

1009498163
1009498163

निसर्गाला रंग हवा असतो.. फुलाला सुगंध हवा असतो.. माणूस तरी एकटा कसा राहणार, त्यालाही मैत्रीचा गंध हवा असतो.. म्हणूनच मैत्री ही कोणासोबत व कशी असावी..?
दुर्जनांच्या व सज्जनांच्या मैत्रीत जमिन अस्मानाचे अंतर असते.. दुर्जनांची मैत्री सकाळ ते दुपार पर्यंत च्या सावली सारखीच असते..सकाळची सावली ही सकाळी खूप लांब व मोठी असते..आणि नंतर ती हळू हळू कमी होत जाते…! आणि दुपारी ती एकदम कमी होते.. याप्रमाणेच दुर्जनांची मैत्री ही आरंभी खूप प्रगाढ व मोठी असते पण हळुहळु ती क्रमश: घटत जाते..याउलट सज्जनांची संगत ही दिवसाच्या दुसर्‍या प्रहरा सारखी म्हणजेच दुपारी कमी पण हळुहळु ती वाढत जाते.. प्रारंभी त्या मैत्रीची सुरुवात ओळखीपासून होते आणि क्रमश: प्रगाढ मैत्रीत त्याचे रूपांतर होते…!

म्हणूनच म्हटलंय की “दुर्जन लोकांच्या मांडीवर बसण्यापेक्षा एकटं बसलेलं बरं.. आणि एकटचं बसण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत बसलेलं कधीही चांगलंच आहे..कारण आपल्या चारित्र्याचा विकास सज्जनांच्या संगतीतचं होत असतो”..!
उतरत्या वयात सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रूपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं असं सुवर्णपान म्हणजे मैत्री मात्र हे मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही..
असं म्हटलं जात की वाईट लोकांची संगत ही त्या कोळशा प्रमाणेच असते.. को॓ळसा जेंव्हा तापलेला म्हणजेच गरम असतो तेंव्हा आपले हात जाळतो आणि थंड असतो तेंव्हा आपले हात काळे करतो.. तुम्ही जर वाघासोबत रहाल तर तो वाघ तुम्हाला संघर्ष करायला शिकवेल आणि गाढवा सोबत रहाल तर ते गाढव तुम्हाला परिस्थिती समोर झुकायला शिकवेल..

सुई जेंव्हा एकटीच असते तेंव्हा ती फक्त टोचण्याच काम करत असते.. पण जशी तीला धाग्याची सोबत मिळते तसं ती त्या फाटक्या कपड्यांना जोडण्याचं काम करते.. म्हणजेच त्या सुईच काम बदलून जातं..हा फक्त आणि फक्त त्या संगतीचा परीणाम आहे.. जसं स्वभाव बदलत नाही पण काम बदलतं.. जुन्या काळातील एक म्हण आहे..”ढवळयाच्या शेजारी पवळा बसला तर वाण लागत नाही पण गुण मात्र नक्कीच लागणार”.. जसं की राजा सर्कस मधे गेला म्हणून काही सर्कस राजमहाल होत नाही.. उलट राजा “जोकर” बनतो.. माणूस ज्या ठिकाणी ऊभा आहे तीच जागा त्याची इज्जत ठरवते..चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या संगतीत बसल्यावर माणसाचा स्वभाव पण चुकीचा वाटायला लागतो..म्हणूनच एकवेळ “पंगत चुकली तर चालेल मात्र संगत चुकायला नको”..

आयुष्यातील प्रवासात संगत ही फार महत्वाची असते..ती आपल्याला खूप “उंचीवर” घेऊन जाऊ शकते.. किंवा ‘खोल दरीत” पण घेऊन जाऊ शकते. केळीच्या झाडा शेजारीच जर बाभळीच झाडं असेल तर त्या बाभळीच्या काटयामुळे केळीची पान फाटून जातील….परंतू याउलट जर चंदनाच्या झाडाशेजारी कडुलिंबाचं झाड असेल तर चंदनाच्या झाडाचा मनमोहक सुगंध त्या कडुलिंबाच्या खोडाला पण येईल.. म्हणूनच जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो.त्याला चांगलीच सावली लाभते.. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सहवासात हनुमान धन्य झाला, भगवान श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला..याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य सर्वश्रेष्ठ असुनही त्यांचा पराभव झाला. आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्यांच्या विचारांचा राहणीमाना चा व वागण्याचा अंमल आपल्यावर होत असतो.. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात..

नेहमीच चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणं हे प्रत्येकासाठी चांगल आहे..एक “सुंदर घर बांधून राहणं” हेच प्रत्येकाचच स्वप्न असतं..परंतू एखाद्याच्या “मनात घर करून राहण” यापेक्षा सुंदर काहीच नसतं..!!
आज आपण कुणाच्या संगतीत काय काय विसरलोय हे थोडक्यात बघूयात…
घरात टी. व्ही. आला अन् आपण वाचन विसरलोय..
दारात गाडी आली अन् आपण चालणेच विसरलोय..!

हातात मोबाईल आला अन् आपण पत्रलेखन विसरलोय… कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे पाढेच म्हणणे विसरलो..!

ए. सी. च्या संगतीने झाडाखालचा गारवा विसरलोय. शहरात राहून मातीचा सुगंध विसरलोय.. बॅंक खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलोय..!

बिभत्स चित्र पाहून खरे सौंदर्य विसरलोय…कृत्रिम सेंट च्या वासाने फुलांचा सुगंध विसरलोय..फास्ट फूड च्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलोय..!

स्वार्थी नाती जपता जपता खरं प्रेम विसरलोय..अन् क्षणिक सुखाच्या लोभात सत्कर्माचा आनंद विसरलोय..!

सतत धावण्याच्या नादात.. क्षणभर थांबणं विसरलोय..अन् WhatsApp आल्यापासून बोलणे पण विसरलोय..!!

चांगला सहवास किती महत्वाचा आणि आपल्या जीवनात काय बदल घडवून आणू शकतो याच..यापेक्षा सुंदर उदाहरण देताना प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) सांगतात की “आकाशातून पडणारा पावसाचा एक थेंब असतो… तो थेंब जर हातावर पडला तर पिण्यायोग्य समजला जातो.. तोच थेंब जर चिखलात पडला तर पाय धुण्याच्या लायकीचा पण राहात नाही.. तोच थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचे अस्तित्व क्षणात नाहीसे होते.. तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला चमकायला लागतो.. आणि त्या कमळाची शोभा वाढवतो.. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो… थेंब तोच आहे पण कोणाच्या सहवासात येतो यावर त्याचे अस्तित्व, पत, प्रतिष्ठा अवलंबून आहे”आपल्या आयुष्याचही तसंच आहे.. सज्जनांच्या संगतीत राहीलं तर चांगले संस्कार नक्कीच होतील..संगत चुकली की आपल्या आयुष्याची दिशा चुकली.. म्हणूनच नेहमीच सत्संगात असावे तर आयुष्याचे नक्कीच सोनं होईल आणि जीवनाच सार्थक होईल…!!


श्री. निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर
छत्रपती संभाजीनगर
मो.नं. – 9881084320


1009828026
1009850407

Related posts

जुन्या आराखड्या प्रमाणे कांदाचाळ उभारणीस परवानगी द्यावी- प.स.सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी !!

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

बर्डमॅन सुमेध वाघमारे – पक्ष्यांसाठी जगणारा एक संवेदनशील माणूस !!

Chief Editor

Leave a Comment