सामाजिक

कै.श्री.अनंतराव थोपटे कणखर नेता

1009793899
1009793899

शब्दांकन – ॲड. श्री. विठ्ठलराव जाधव (उपसंपादक दै. सामना)

गटविकास अधिकारी या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले आणि थेट आमदार झालेले अनंतराव थोपटे यांचा राजकीय काळ अत्यंत कणखर आणि धडाडीचा राहिला. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये त्याकाळी पुणे शहरात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे केंद्रीय राजकारणात सक्रिय आणि बडे नेते होते.जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर शरद पवारांचा पकडा होता. पवार यांनी युवक नेता म्हणून स्वतःची फळी निर्माण केली होती. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे सरकार आले तरी काँग्रेस नेतृत्वाला पवारांना टक्कर देईल असा नेता हवा होता. ही पॉलिटिकल गॅप अनंतराव थोपटे यांनी भरून काढली.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विश्वास संपादन केला. वसंतदादा समर्थक म्हणून त्यांनी आक्रमक राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व देखील पवार यांना रोखण्यासाठी तगडा नेता म्हणून अनंतराव थोपटे यांना बळ देत राहिले. शरद पवारांचे आरस काँग्रेस, पुलोद चा प्रयोग जिल्ह्यात जोर धरत असताना काँग्रेसची खिंड लढविण्यासाठी थोपटे यांना प्रा. रामकृष्ण मोरे यांची साथ मिळाली.

1980 च्या लोकसभा निवडणुकीत रामकृष्ण मोरे खेड मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर थोपटे आणि खासदार मोरे या जोडीने संपूर्ण पुणे जिल्ह्यावर वर्चस मिळवले. पुणे जिल्ह्यात एवढी सत्ता मिळवली की अगदी बारामतीतील सहकारी संस्था देखील थोपटे -मोरे यांनी ताब्यात घेतल्या. पिडीसीसी बँक, कात्रज दूध संघ, पुणे बाजार समिती. या जिल्ह्यातील शिखर संस्थांवर त्यांचे वर्चस्व राहिले.

पुढे शरद पवार हे काँग्रेसमध्ये आले तरी जिल्ह्यात थोपटे मोरे यांचा गट आणि त्याचे वर्चस्व अगदी 1999 पर्यंत कायम राहिले.दुग्धविकास आणि शिक्षण मंत्री म्हणून थोपटे यांची कारकीर्द गाजली. दुधाचा महापूर, दूध पंढरी सारख्या योजना त्यांनी आणल्या. संकरित गाई, त्यांची पैदास यावर लक्ष केंद्रित करून खेडोपाडी दूध उत्पादन आणि सहकारी दूध व्यवसाय वाढवला.

त्या काळात मुंबईत दुधासाठी पहाटेपासून रांगा लागायच्या. बाटली दोन बाटली दुधासाठी मंत्र्याचे पत्र लागायचे. अशावेळी त्यांनी राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंद डेअरीच्या माध्यमातून मुंबईत दुधाचा महापुर आणला. महानंदाचे देखील ते अध्यक्ष राहिले.आरे, सरिता केंद्रांवर दुधाची उपलब्धता करून दिली. खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रयोग हा अनंतराव थोपटे शिक्षण मंत्री असतानाच्या काळातील !!

ज्या भोर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत नेतृत्व केले त्या तालुक्यातील लोकांच्या विकासासाठी डोंगरी परिषद त्यांनी स्थापन केली. दत्त दिगंबर दूध वाहतूक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम भोर वेल्हा आताचे राजगड तालुक्यातील पिढ्या कधीच विसरणार नाहीत. जे लोक टँकरवर ड्रायव्हर, क्लिनर होते ते नंतरच्या काळात टँकरचे मालक झाले.

थोपटे हे तेरा वर्ष पुण्याचे पालकमंत्री राहिले. डोंगरी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली. राजगड शिक्षण संस्था काढली. राजगड सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. डोंगरी परिषदे संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक वक्तव्य केले होते.त्याच्या विरोधात थोपटे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा आणि दोघांमधील वाद गाजला. पुढे 2004 मध्ये त्यांच्यात समझोता झाला.

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. या काळात थोपटे आमदार होते. 1999 ला काँग्रेस सोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मधून अनंतराव यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीचे ते राज्याचे प्रमुख झाले. काँग्रेस पक्षातील राजकारण , उमेदवार निवडीचा घोळ आणि मुंबई ,दिल्लीतील बैठका यामध्ये त्यांचा बराचसा वेळ जाऊ लागला. शरद पवार यांनी ही बाब हेरली. भोर मध्ये थोपटे यांच्या विरोधात तालीम केली.

थोपटे यांचे निकटवर्ती असलेले काशिनाथ खुटवड यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारीने देण्याचा निर्णय घेतला. खुटवड हे भूविकास बँक, जिल्हा दूध संघ, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते. त्याचा फायदा खुटवड यांना मिळाला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा भोरमध्ये घेण्याचा निर्णय झाला. भोर शहरातील चौपाटीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सोनिया गांधी यांची ही सभा होणार होती. सभेची तारीख आणि दौरा ठरला. मात्र नेमकी त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. सोनिया गांधी यांच्या या कार्यक्रमात थोडासा बदल करून त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आल्या आणि नंतर धुवाधार पावसामध्ये थोपटे यांच्यासाठी प्रचंड मोठी सभा भोर मध्ये झाली. थोपटे काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. तसे सूचक वक्तव्य देखील काँग्रेस नेत्यांकडून सभेत झाले. मात्र एवढे सगळे प्रचंड
अनुकूल वातावरण असताना देखील थोपटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. किंबहुना थोपटे साहेब मुख्यमंत्री होणार हाच प्रचार त्यांना तोट्याचा ठरला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रणनीती आखून मुख्यमंत्री होण्यापासून थोपटे यांना रोखले. या प्रभावानेच 1999 मधील महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली.

निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. मात्र थोपटे सत्तेच्या बाहेर राहिले. पुढे 2004 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एवढी काशिनाथ खुटवड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सेटिंग जागा असताना देखील आघाडीतील जागा वाटपात मुख्य यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडली. शरद पवारांनी बोरची सेटिंग जागा सोडण्याचे कारण आजही गुलदस्त्यात आहे. डोंगरी परिषदेची उच्च न्यायालयातील केस यामागे एक कारण असल्याचे सांगितले जाते.

पुणे जिल्ह्यातील राजकारण आणि दैनिक सामनासाठी विधिमंडळातील बातमीदारी करताना थोपटे यांचा आणि माझा जवळून संबंध आला. भोर तालुक्यातील पुनर्वसनाचा प्रश्न ते हिरहिरीने मांडायचे. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या अपुऱ्या कामांच्या पाहणीसाठी तीन दिवसांचा दौरा केला. जलसंपदा लवादाच्या निर्णयानुसार पश्चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी ज्यादा पैसा दिला. त्यामुळे राज्यातील इतर भागात निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाचा निधी बंद केला होता.दुष्काळी स्थिती आणि विशेष बाब म्हणून अपुऱ्या धरण प्रकल्पांसाठी कृष्णा खोरे विभागाला निधी मिळावा यासाठी राज्यपालांचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवायचा होता.या दौऱ्यात थोपटे यांनी नीरा देवघर धरणाच्या साइटवर राज्यपालांना खड्या शब्दात आणि डोंगरी भाषेत धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्याचे मी जवळून अनुभवले.

राजगड कारखान्याला आर्थिक मदत व्हावी. कर्ज मिळावे यासाठी त्यांनी विधानसभेत धोपटे यांनी केलेला विनंती अर्ज हा त्यावेळी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला होता.

विधिमंडळ अधिवेशन काळात ज्येष्ठ आमदारांचा एक ग्रुप होता. गणपतराव देशमुख, अनंतराव थोपटे, विलासकाका उंडाळकर,गिरीश बापट, स्वरूप सिंग नाईक, विक्रमसिंह पाटणकर, उल्हास दादा पवार, बाळासाहेब शिवरकर, हे अधिवेशन सुरू असताना दर गुरुवारी रात्री एकत्र शाकाहारी जेवणासाठी जायचे. मी पुण्याचा माणूस, गिरीश बापट यांच्याकडे मॅजेस्टिक आमदार निवासात राहिला असल्याने या सर्वांशी माझा जवळचा परिचय झाला होता त्यामुळे ते सर्वजण आवर्जून अरे आपला तो पुण्यातला पत्रकार, जाधव त्याला बरोबर घ्या. असे सांगायचे. त्यांच्या पी ए कडून निरोप यायचा कुलाब्यातील ठरलेल्या त्या शाकाहारी हॉटेलमध्ये या सर्व ज्येष्ठ नेते आमदारांच्या मैफिलीचा सहवास मला अनेकदा मिळाला. थोपटे साहेब आवर्जून माझी विचारपूस करायचे.भोर मध्ये त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला त्यालाही मी उपस्थित होतो.

थोपटे साहेबांच्या दुसऱ्या टप्प्यातील कालखंडाचे राजकारण मला जवळून पाहत आले. 1995 नंतर ते फक्त आमदार होते. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी पोमन यांच्या दालनामध्ये त्यांचा तळ असायचा. जिल्ह्यातील आणि राज्यातील राजकारणाची प्रदीर्घ गप्पांची मैफिल याच दालनामध्ये व्हायची. थोपटे साहेब पिडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उभे होते. ही निवडणूक एवढी अटीतटीची झाली की थोपटे साहेब आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अण्णा भिकुले या दोघांना समान मध्ये पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रचंड तणावाखाली होते. शेवटी चिठ्ठी टाकून निवडणुकीचा निर्णय घेण्याचे ठरले. त्यावेळी दोन चिठ्ठ्यांमध्ये उचललेल्या चिठ्ठीतील उमेदवार विजयी होणार की खाली राहिलेल्या चिठ्ठीतील उमेदवाराचा विजय घोषित करायचा या प्रश्नावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यला कोंडीत पकडले. नियमांचा बराच खल झाला. मात्र नशीब थोपटे साहेबांच्या बाजूने होते चिठ्ठी मध्ये त्यांचा विजय झाला ते बँकेचे संचालक झाले. मतमोजणीचा तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.

गेल्या काही वर्षापासून थोपटे साहेब सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र शेतीमध्ये ते सक्रिय असायचे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थोपटे यांच्या घरी जाऊन सुप्रिया सुळे यांना मदत करावी म्हणून त्यांची भेट घेतली. थोपटे यांनी मोठ्या मनाने शरद पवार यांचा शब्द ऐकला. सुप्रिया सुळे यांना भोर मधून मोठे मताधिक्य मिळाले. थोपटे यांचा हा शेवटचा राजकीय निर्णय म्हणावा लागेल.

वयाच्या 93 व्या वर्षी थोपटे साहेबांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन..

विठ्ठल जाधव (उपसंपादक – दैनिक सामना)

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520
1009760330
1009760332
1009792054
file 000000001d0c72079456e95510983aa3

Related posts

कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी सकारात्मक चर्चेसाठी पुढे यावे- मा.मंत्री दिलीप वळसे पाटील

Chief Editor

समर्थ कॉलेजमध्ये ड्रोन वर्कशॉप व ड्रोन स्पर्धा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे बाल आनंद मेळाव्यात तब्बल १ लाख १० हजारांची उलाढाल !!

Chief Editor

Leave a Comment