सामाजिक

पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!

1009605232
1009605232

पंचनामा विशेष – तमाशा ही केवळ लोककला नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोकसंस्कृतीची जिवंत परंपरा आहे. ढोलकीच्या ठेक्यावर, तुणतुण्याच्या सुरांवर आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयावर उभी राहिलेली ही कला अनेक कलाकारांच्या आयुष्याला आकार देत आली. या तमाशा विश्वात काही कलाकार असे जन्माला येतात की, त्यांच्या जन्मापासूनच नियती त्यांच्या कपाळावर कलाक्षेत्राचे भाग्य लिहून ठेवते. अशाच एका विलक्षण कलाकाराचे नाव म्हणजे पद्मश्री तमाशा सम्राट रघुवीर खेडकर !!

तमाशा फडांचा हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते मे महिना. या काळात गावोगावी खेळ रंगत असतात , तर पावसाळा सुरू झाला की कलाकारांचे करार, नव्या वगनाट्यांची बांधणी, गण-गवळण, रंगबाजी, फार्स आणि वगनाट्यांच्या तालमी असा कलावंतांचा वर्षभराचा प्रवास सुरू होत असतो. पूर्वी पावसाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रातील नामांकित तमाशा फड मुंबई आणि पुण्यातील थिएटरमध्ये मुक्कामी येत असत.

सन १९६१ मध्ये मुंबईच्या लालबाग येथील मधुकर नेराळे यांच्या प्रसिद्ध हनुमान थिएटरमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज तमाशा फड दाखल झाले होते. त्यामध्ये तमाशा क्षेत्रातील नावाजलेले कलावंत तुकाराम खेडकर यांचा फडही होता. त्या काळात हनुमान थिएटर म्हणजे तमाशा कलेचे जणू विद्यापीठच होते. याच थिएटरमध्ये माधवराव नगरकर यांचाही तमाशा मुक्कामी होता. माधवराव नगरकर हे त्या काळातील तमाशा क्षेत्रातील अत्यंत मोठे आणि मानाचे व्यक्तिमत्त्व होते.

तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, पांडुरंग मुळे, गुलाबराव बोरगावकर, दत्ता महाडिक पुणेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्या तमाशात काम करून आपली कला अधिक समृद्ध केली होती.
६ ऑगस्ट १९६१ रोजी हनुमान थिएटरमध्ये एका बालकाचा जन्म झाला. आई कांताबाई सातारकर यांच्या कुशीत विसावलेले ते बाळ पुढे तमाशा विश्वाचा तारा ठरणार आहे, याची कल्पना त्या वेळी कुणालाही नव्हती. जन्मानंतर अवघ्या पाचव्या दिवशी माधवराव नगरकर यांचे “नाथ प्रसन्न रघुवीर” हे वगनाट्य रंगमंचावर सादर होत होते. त्या वगनाट्यात एका लहान बाळाचा प्रसंग होता आणि त्या भूमिकेसाठी नेहमीप्रमाणे बाहुलीचा वापर करण्यात येणार होता.

मात्र त्या दिवशी नियतीने काही वेगळेच ठरवले होते…
माधवराव नगरकर यांची नजर आईच्या मांडीवर खेळणाऱ्या त्या नवजात बाळावर पडली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या बाळाला उचलून थेट रंगमंचावर आणले. ढोलकीच्या गजरात, प्रकाशझोतात आणि रसिकांच्या साक्षीने त्या पाच दिवसांच्या बाळाची तमाशा रंगभूमीवर पहिली एन्ट्री झाली. वडील तुकाराम खेडकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की, हेच बाळ पुढे तमाशा विश्वातील अजरामर नाव ठरणार आहे.

विशेष म्हणजे त्या वगनाट्याचे नाव होते — “नाथ प्रसन्न रघुवीर” आणि याच वगनाट्याच्या नावावरून त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले — “रघुवीर”.
तोच हा आजचा पद्मश्री सन्मानाने गौरवलेला तमाशा सम्राट रघुवीर खेडकर!

रघुवीर खेडकर यांचा कलाप्रवास म्हणजे संघर्ष, साधना आणि कलेवरील निष्ठेचा प्रेरणादायी इतिहास आहे. अवघ्या बालवयापासून तमाशाच्या फडात वाढलेल्या या कलावंताने समई नृत्य, थाळी नृत्य, गायन, नायकाच्या भूमिका आणि विशेषतः सोंगाड्या म्हणून आपल्या अद्वितीय अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या विनोदी अभिनयातील सहजता, संवादफेकीतील टायमिंग आणि लोकभाषेतील जिवंतपणा यामुळे त्यांनी तमाशा रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
आज वयाची पासष्ठी ओलांडल्यानंतरही रघुवीर खेडकर यांचे नाव तमाशा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी इतिहासच आहे.

जन्माच्या पाचव्या दिवशी रंगमंचावर झालेली त्यांची एन्ट्री ही केवळ एक घटना नव्हे, तर तमाशा कलेने आपल्या लेकराला दिलेला आशीर्वाद होता.
तमाशाच्या फडात जन्मलेला हा कलाकार पुढे पद्मश्री सन्मानापर्यंत पोहोचला, ही महाराष्ट्राच्या लोककलेची अभिमानास्पद गाथाच म्हणावी लागेल.

साभार लेख – अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक )

fb img 1774661449199

Related posts

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जाणून लागली पाणीटंचाई !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी येथे ‘प्रवेश उत्सव’ उत्साहात;डीजेच्या तालावर पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक!!

Chief Editor

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने जारकरवाडी येथे “आनंद अनुभूती शिबिर” होणार संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment