सामाजिक

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वानखेडे स्टेडियममध्ये बसून अनुभवला आय.पी. एलचा थरार !!

1009600542
1009600542

माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण – अशोक मावळे (मुख्याध्यापक, शाळा वळती)

पंचनामा विशेष – आयपीएल पहायला वळती शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जायचे स्वप्न अनेक दिवस मनात होते तो दिवस २४ मे २०२६ उगवला. मनात प्रचंड समाधान होते पण इतक्या लहान मुलांना इतक्या दूर मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात घेऊन जायचे ही मनात काळजी ही होती परंतु सर्व पालकांच्या सहकार्याने वेळेची शिस्त पाळल्याने रिलायन्स फाउंडेशनच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही ट्रीप यशस्वी करण्याचे समाधान मिळाले.

पहाटे 4:30 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. गाडी येण्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात नवीकोरी लक्झरी गाडी आली .भराभर सर्व विद्यार्थी गाडीत बसले आणि गाडीची पूजा अशोक मावळे यांनी केली.गाडी सुरू झाली मुंबईच्या दिशेने प्रवास चालू झाला. कात्रज डेरी जवळ सर्व सातही गाड्या थांबल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता पाणी देण्यात आले मुलांनी पोटभर नाष्टा केला . हे सर्व नियोजन मा.वैभव शेठ उंडे व महेश शेठ थिटे यांनी सांभाळले.

गाड्यांचा प्रवास सुरू झाला आणि विद्यार्थ्यांनी गाण्यावर ठेका धरला. विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि याचा आनंद आम्हा शिक्षकांना दिसत होता. शिक्षकही विद्यार्थ्यांसमवेत आनंद व्यक्त करत होते.

यशवंतराव चव्हाण महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या आलिशान थांब्यावर गाड्या थांबल्या. सर्व विद्यार्थी फ्रेश होऊन पुन्हा गाड्यां मध्ये बसले. मुंबईच्या दिशेने हळूहळू गाड्या सरकत होत्या. गाडी पहिल्या बोगद्यात गेली आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दुसऱ्या बोगद्यात गाडी गेली आणि पुन्हा तोच जल्लोष .छोटे दोन बोगदे त्या ठिकाणी लागले विद्यार्थ्यांना ते संपूच नव्हे असेच वाटत होतं मग मी त्यांना सांगितलं ९ किमी लांबीचा बोगद्यातून आपण प्रवास करणार आहोत. जगातील सर्वात लांबीचा बोगदा विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवत होता.

थोड्याच वेळात सह्याद्री पर्वता मधून लांबलचक असणाऱ्या जागतिक स्थळावरील दखल घेतलेल्या बोगद्यातून प्रवास सुरू झाला. विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साह आणि आनंद व्यक्त केला खूप वेळ गाडी त्या बोगदयातून जात होती आणि मुलं जल्लोष करीत आनंद घेत होती.थोड्याच वेळात सर्व गाड्या रिलायन्स कंपनीत पोहोचल्या अतिशय सुंदर , नीटनेटक्या,काचेच्या गगनचुंबी इमारती पाहिल्यावर मुले मन हरखून गेली.स्वतः सखारामजी थिटे साहेब गाडी जवळ थांबून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत होते.

गावाकडील विद्यार्थी आयपीएल पाहण्यासाठी जात आहेत याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता.कमलीची शिस्त आणि शांतता पाहायला मिळत होती. प्रत्येक जण अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करत होता. प्रचंड स्वच्छता ,नीटनेटकेपणा अनुभवायला मिळत होता.काश्मीरमधील नंदनवनात आल्याचा आनंद होत होता. अतिशय रुचकर , स्वादिष्ट जेवणाची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळाली. गुलाबजाम ,शेजवान राईस, रायता, चपाती, पनीर भाजी, नूडल्स हे सर्व पदार्थांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. सहा सातशे विद्यार्थी एकाच वेळेस बसून जेवणाचा आनंद घेत होते पण प्रचंड शांततेत. जेवणानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद पाहायला मिळत होता.

काही विद्यार्थ्यांनी विचारलं सर काश्मीर सारखे नंदनवन यालाच म्हणतात का ? हो, असेच असते नंदनवन. उत्कृष्ट नियोजन, प्रेमळपणा, सहकार्य वृत्ती, सेवाभाव, आणि सर्व असूनही कमालीची नम्रता मा.थिटे साहेबांकडून अनुभवास मिळाली.

माझ्या जीवनात अनेक आदर्श आणि अतुलनीय व्यक्तिमत्व पाहिले त्यापैकीच एक आदरणीय सखाराम थिटे साहेब. रिलायन्स सारख्या जागतिक स्तरावरील नामवंत कंपनीला भेट दिल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कंपनीमधील CEO, CA, मॅनेजर उच्चपदस्थ अधिकारी विद्यार्थ्यांबरोबर अतिशय प्रेमाने, सहकार्याने वागत होते. आपण एवढ्या मोठ्या पदावर काम करत आहोत हे विसरून ते प्रचंड आपुलकीने काम करत होते. त्यांच्यात मला खूप मोठा सेवाभाव पाहायला मिळाला.

गर्दीत कोणीही चुकू नये म्हणून हातात बांधण्यासाठी नावाचा ब्रँड , आय कार्ड, टी-शर्ट, कॅप,आणि सोबत वेगवेगळे खाऊचे बॉक्स पाहून विद्यार्थी खूपच खुश झाले होते. सोबत शैक्षणिक साहित्याची बॅगही मिळाली. बॅगेत अनेक खेळण्याच्या वस्तू पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. सूर्य आग ओकत होता म्हणून विद्यार्थ्यांची आरोग्यदृष्ट्या खूप काळजी घेतली गेली. शिक्षकांप्रती प्रचंड आदरभाव, रिस्पेक्ट पहायला मिळत होता. भारताच्या या आर्थिक राजधानीत मुश्किल होत असते परंतु हजारो विद्यार्थ्यांचं नियोजन उत्तम प्रकारे करण्याचं काम हातून घडत होतं.

शाळेत पुस्तकात शिकलेली झुक झुक गाडी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला.
महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या मुंबई सारख्या मायानगरीतील विशाल आणि विस्तीर्ण, डोळ्याचे पारणे फेडणारे वानखेडे स्टेडियम पाहून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आपण देशात आहोत की परदेशात. एकेकाळी टीव्हीवर पाहिलेलं आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले .सोबत ड्रायफ्रूट आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मनोरंजनासाठी खेळणी आणि प्रेक्षकांचा माहोल एक वेगळंच चैतन्य निर्माण करत होता .प्रत्येक जण मनापासून आनंद घेत होतो. आलिशान असलेल्या या वानखेडे स्टेडियमवर प्रत्येक गॅलरीला सुनील गावस्कर यांसारख्या महान खेळाडूंची नावे दिलेली पाहायला मिळाली. प्रत्येक महान व्यक्तीचा गौरव कशाप्रकारे होतो हे लक्षात आले. प्रत्यक्ष क्रिकेट कॉमेंट्रीचा अनुभव घेतला. वेगवेगळ्या गीतांवर खेळाडूंना जबरदस्त प्रोत्साहन दिले जात होते.रोहित..रोहित..रोहित…. असं चेरप देताना प्रत्येक जण त्यात सामील होत होता.

मुंबई इंडियन्स x राजस्थान रॉयल्स चित्त थरारक सामना पाहायला मिळाला .जबरदस्त चौकार आणि षटकार पाहून डोळ्याचे पारणे फिटत होते. राजस्थान रॉयल्स मॅच विन झाला. सामना संपला.आणि वेध सुरू झाले घरी जायचे. हजारो प्रेक्षकांनी खचून सर्व स्टेडियमच्या गॅलरया भरल्या होत्या. परंतु रिलायन्स कंपनीचे वेगवेगळे अधिकारी उत्तम नियोजन करत होते. गाडीपर्यंत बसून देण्याची सोय करत होते. स्वतः मा. सखाराम थिटे साहेब हेही उपस्थित होते. वानखेडे स्टेडियम येथे बंदोबस्तासाठी असणारे साक्षी लोखंडे आणि आशुतोष दळे पोलीस सेवा बजावणारे माझे विद्यार्थीही भेटले. गाडीमध्ये सायंकाळचे जेवणाची डबे आलेले होते. जेवणाचा आस्वाद घेऊन मुले शांततेत वातानुकूलित लक्झरीत झोपी गेली.मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना शीट ऍडजेस्ट करून दिले. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण पुन्हा कधीही विसरू शकणार नाही.

शाळा वळती, भागडी , शिंगवे काटवान वस्ती,गांजवेवाडी, कारमळा, पांढरीवस्ती, जालिंदर नगर यासारख्या विद्यार्थ्यांची सफर मा.सखारामजी थिटे साहेब यांच्यामुळेच झाली.त्यांना सर्व शिक्षक , विद्यार्थी, ग्रामस्थ यांचेकडून मनापासून धन्यवाद!!
रिलायन्स फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचेही मनापासून आभार !!!
आणि हा सर्व प्रवास उत्तम प्रकारे नियोजन करून पार पाडण्यासाठी कष्ट करणारे मा.महेशजी थिटे आणि मा.वैभवजी उंडे यांचे मनापासून आभार🙏🙏

शब्दांकन :- अशोक मावळे (मुख्याध्यापक,शाळा वळती)

fb img 1774661449199

Related posts

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

Chief Editor

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा; पुण्यात एकाच वेळी घोडनदी, कुकडी, मीना नदी सह होणार ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जेष्ठ आणि तरुणांच्या श्रमदानातून वटवृक्षाला बनवला ओटा !!

Chief Editor

Leave a Comment