लेखन: बाळासाहेब मेदगे
औदर (राजगुरुनगर)
9324597921

पार्वताबाई दाराच्या उंबऱ्यात बसल्या होत्या.सध्या त्यांनी सत्तरी ओलांडली होती.हाताशी नातवंड खेळायला आली होती.सत्तरीत पोहचलेल्या पार्वताबाई गोऱ्या गोऱ्या पान,नाकात भरभक्कम नथ,हातात चांदीचे पाटले,कपाळावर मोठ्या आकाराचे मेन व त्यावर लावलेले कुंकू आणि नऊवारी साडी,गळ्यात सोन्याच्या नऊ पुतळ्या,पांडुरंगाची माळ असा मराठमोळा साज असलेल्या पार्वताबाई नेहमी आनंदी आणि समाधानी दिसत होत्या.आजूबाजूला लग्न जमत नाही, जमली तरी टिकत नाही ,या घडामोडीचा त्या विचार करत असताना त्यांचे हरवलेले बालपण त्यांना चित्रपट रूपाने दिसू लागले होते.नवऱ्या मुलाचा चेहरा ही न पहाता लग्नाला दिलेला होकार त्यांना आठवू लागला होता.
पार्वताबाईच्या लग्ना अगोदरचे नाव अनुसया होते.वयाची सहा वर्षे असतील तेव्हा तिला तिच्या आईने गावठी शाळेत पाठवले होते.एक शिक्षकी शाळा होती. ती ही इयत्ता चवथी पर्यंत आणि शाळेत एकूण मुले होती दहा.या दहा मुलांना शिकवणारे शिक्षक होते ते ही त्या काळातील सातवी शिकलेले.स्वातंत्र्य मिळाले होते पण इंग्रजी अनुशासन संपले नव्हते.चार बुक शिकायला हवं असा विचार रुळू पाहत होता.अनुसया शाळेत गेली आणि काही दिवसातच गुरुजींची चाहती झाली होती.विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अनुसया देत असल्याने सगळ्या शाळेत ती लोकप्रिय झाली होती.स्वातंत्र्यदिन , प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनुसया देशभक्तीपर, शेतकरी गीतं गात असे त्यामुळे गावातील लोकं अनुसयाच्या वडीलांना म्हणजेच सखाराम नानांना बोलत असे एकुलती एक मुलगी पण गुणाची निघाली असे ऐकल्यानंतर सखाराम नानांची छाती गर्वाने फुगत असे.चवथी पर्यंत शिक्षण झाले होते आणि ती आता दहा ते बारा वर्षात पदार्पण करू लागली होती. बाल विवाह प्रथा बंद करण्यासाठी काही समाजसुधारकांनी किती प्रयत्न केले हे तिने शाळेत पाहिले होते,ऐकले होते.त्यामुळे योग्य वयात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत लग्न करायचे नाही हे तिने ठरवले होते.त्या काळात मुलीचे वय बारा वर्षे झाले की मुलगी उपवर झाली असे समजले जात होते.गावातील बरीच जानकर मंडळी सखाराम नानांकडे अनुसयाच्या लग्नाबद्दल बोलत होती.
अनुसयाचे आई आणि वडील पंढरीचे वारकरी होते. जन्म जात त्यांच्या दोघांच्याही गळ्यात पांडुरंगाची माळ होती.घरात सांप्रदायिकतेचे वारे वाहत होते.रोज घरात हरिपाठ म्हटला जात होता.श्रावण महिन्यात ग्रंथ लागला जात होता.ईश्वरभक्तीचा मळा सदाकदा भरलेला दिसत होता. हे सगळे संस्कार अनुसयाच्या जडणघडणीवर होत होते.अनुसया आता आषाढी वारीला निघालेल्या आई वडिलांकडे वारीला जाण्याचा हट्ट धरू लागली होती.वारी म्हणजे ऊन, वारा, पाऊस, यांचा सामना करावा लागतो,जेवणाची,झोपेची नक्की वेळ नसते,या सर्व गोष्टी आमची ही चिमुकली कशी सहन करणार म्हणून आई वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करत असे.एक दोन वर्षे गेल्या नंतर तिने मात्र वारीला जाण्याचा चंगच बांधला.कधी एकदा पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेईन अशा त्या जीवाला झाले होते.आणि खरोखर त्या आषाढी वारीला ती तिच्या आईवडिलांबरोबर गेली होती.
वारी ही पायी पायी चालत जात असल्याने मुक्कामाच्या ठिकाणी ही अनुसया आपल्या आई वडिलांची सेवा करत असे.आईचे पाय चेपून देणे,आंघोळीला पाणी आणून देणे,पुढील प्रवासाची तयारी करणे अशी तिला जमेल तशी ती कामे करत होती.मुलीचे हे वागणे पाहून सखाराम नाना आणि तिची आई चंद्रभागा मन ही मन आनंदी होत होते.
वारी पूर्ण करून आल्या पासून अनुसया एखाद्या पोक्त स्त्री सारखी वागू लागली होती.घरापुढचे अंगण घरातील कपिला गायीच्या शेणाने सारवत होती.अंगणात भली मोठी तुळस लावली होती.रोज नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती लागली जात होती.येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्या मंडळींची विचारपूस,त्यांना पाणी देणं ,अशी सगळी पाहुणचाराची कामे अनुसया करू लागली होती.गावातील काही जानकर मंडळी अनुसयाच्या वागणुकी बद्दल सखाराम नानाचे अभिनंदन करत होते.अशी मुलगी घरात जन्माला यायला परम भाग्य लागते असे बोल सखाराम नानाला ऐकू येऊ लागले होते.
अठराव्या वर्षात पोहचलेल्या अनुसयाला लग्नासाठी स्थळ चालून येऊन लागली होती.त्या काळात गावे सदा कदा भरलेलीच होती.शहरात एखादे अर्धेच कुटुंब वास्तव्याला असायचे त्यामुळे मुलगा नोकरीला पाहिजे,मुंबईत घर पाहिजे अशा काहीही मागण्या नवरी मुलीकडून होत नव्हत्या.मुलगी जर सून म्हणून करून आणायची असल्यास मुलीच्या बापाला तीन चार मण तांदूळ किंवा इतर पदार्थ द्यावे लागायचे.असेच एक स्थळ दोन डोंगरांच्या पलीकडील गावातून आले होते.त्याच्या घरी जमीन चांगली होती.घरात तो एकटाच होता.घरात सगळे माळकरी कुटुंब होते.एक वेळ घरात पैसा नसला तरी चालेल पण कुटुंब पंढरीचे वारकरी असावे असे सर्व सामान्य माणसाला वाटत असायचे.
इकडे अनुसया जवानीच्या उंबरठ्यावर असताना दिसायला एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती.भले कपडे भरजरी नसतील तरी अंगभरून चोळी, परकर,पायात चांदीची पैंजणे,नाकात बारीकशी नथनी,चालताना पायातील पैंजणातील गुंगराच्या आवाजाने अनुसया आली असा भास प्रत्येकाला होत होता.
त्या दिवशी दोन माणसं त्यांच्या घरी आली होती.डोक्यावर पांढरे पागोटे,जुन्या वळणाचा नेहरू,धोतर अशा वेशात ही माणसं सखाराम नानाच्या घरी पोहचली होती.त्यांना पाणी अनुसयाने आणून दिले होते.तिच्या आईने चहा ठेवला होता.तो चहा घेऊन अनुसया ओटीवर आली होती.मागील आठवड्याच्या बाजारात मुलगी बघायला येतो म्हणून या माणसांनी सखाराम नानांना सांगितले होते.ही दोन्हीही माणसं सत्तरी ओलांडलेली दोन डोंगर पायी चालून आली होती.त्याकाळात रस्त्यांनी एवढी प्रगती केली नव्हती.गावातील पाटील त्या बैठकीला आले होते.पाटलांनी चर्चेला सुरवात केली होती.मंडळी तुम्हाला जिने चहा, पाणी ,आणून दिला तिचेच लग्न करायचे आहे पसंत आहे ना मुलगी? त्यावेळी आलेल्या माणसांनी होकार दिला होता.या माणसामध्ये ज्या मुलाचे लग्न करायचे होते त्याचे एक वडील होते तर एक चुलते होते. माज घरात अनुसयाला नऊवारी साडी घालण्याचे काम चालू होते.मुलगी पसंत आहे असे कळल्यावर सखाराम नानांनी तिच्या आईला तयारी करण्यास सांगितले होते.आता मुलगी तर पाहिली आहे मग ओटीत नारळ टाकूनच जावं म्हणजे लवकरच साखरपुडा उरकून टाकता येईल असे नवऱ्या मुलाच्या वतीने त्याच्या वडिलांनी सांगितले होते.नऊवारी साडी घालून अनुसया पाटावर बसली होती.पाटलांच्या उपस्थितीत ओटीत नारळ टाकला होता.देण्या घेण्याच्या गोष्टी ,साखरपुडा कधी,अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा करून पाहुणी मंडळी त्यांच्या घरा गेली होती.
एक महिन्याचा काळ गेला असेल ब्राह्मणाकडून तिथ पाहून साखरपुडा उरकला होता.लगेच दोन महिन्यानंतर लग्नाची तिथ आली होती. जसा साखरपुडा झाला तेव्हापासून सखाराम नाना आणि चंद्रभागा यांना जेवण गोड लागत नव्हते.सुईच्या टोकासारखे जपलेल्या आमच्या मुलीचे दुसऱ्याच्या घरात नववधू होऊन जाणे पचनी पडत नव्हते.पण चंद्रभागा बाई कधी तरी विचार करत असे मुलगी हे दुसऱ्याच्या घरचे धन असते हे सत्य आपल्याला स्वीकारावच लागेल.या दोन्ही उभयंता ना सगळा भूतकाळ अनुसयाचा दिसत होता.अनुसया सुद्धा खूप गंभीर बनत चालली होती.माझा होणारा नवरा पांडुरंगाचा वारकरी आहे,त्यामुळे माझे येणारे सुख दुःख पांडुरंगच वाटून घेणार आहे असा विश्वास तिच्या मनात दडून राहिला होता.
दोन महिन्याच्या कालावधी मध्ये दोन्ही बाजूंच्या मंडळींनी बस्ता बांधून घेतला होता.एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घेतले होते.कधी कधी एकटी असताना अनुसया भावी नवऱ्याला सुखी संसाराचा शिलेदार समजत होती.जसा एखादा शिलेदार युद्धावर जात असताना आपल्या अर्धांगिनी कडून ओवाळून घेतो तसा तिला भास होत होता.
आणि एकदाचा हळदीचा दिवस उजाडला होता.नवऱ्या मुलाला हळद लावून उष्टी हळद घेऊन दोन माणसे पायीच आली होती.संध्याकाळी चार वाजता अनुसया ला वाजंत्री मंडळीच्या उपस्थितीत हळद लागली होती.काही ओळखीच्या माणसांनी तिला जेवायला बोलावले होते.जेवणात दूध, भात, गुळ, शेवईची खीर,खोबऱ्याची वाटी दिली जात होती.रात्री बऱ्याच मैत्रिणी जमल्या होत्या. त्यातील दोन जनी कलवऱ्या म्हणून वावरत होत्या.काही जुन्या पद्धतीची गाणी म्हणत होत्या.त्याकाळात स्पीकर नव्हता.फक्त लगीन घरातच लग्न आहे असे माहित पडत होते.दुसऱ्या दिवशी सात आठ बैलगाड्या , वऱ्हाड, नवऱ्या मुलीसाठी देण्यात येणारे चार मण तांदूळ अशा सगळ्या लवाजम्यासह नवरदेव गावातील मंदिरापुढे पोहचला होता.त्याची गावरान पद्धतीने म्हणजे लेझीम खेळून मिरवणूक काढली होती.लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला होता.सखाराम नानाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते.पण कोणालाच हे तो माहिती पडून देत नव्हता.मुलीच्या मामाने अनुसया ला कडेवर उचलून आणले होते.
लग्नाचे पाच मंगलाष्टक झाले होते.वाजंत्री मंडळींनी शुभ मंगल सावधान म्हटल्याबरोबर वाजवले होते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या माझ्या मुलीला माझे घर फक्त माहेर म्हणूनच राहील या विचाराने सखाराम नाना ओक्साबोक्शी रडत होते.तिकडे चंद्रभागाच्या डोळ्यातून सतत गंगा जमुना अश्रूच्या रूपात वाहत होत्या.गुणाची माझी लेक कायम या घराला मुकणार म्हणून इतर बायांच्या गळ्यात गळा घालून चंद्रभागा बाई रडत होती.अनुसया मात्र आई वडिलांची अवस्था पाहून घायाळ मी हरिणी अशा अवस्थेत वावरत होती.तिच्या ही अश्रूंना मैत्रिणी पुसत होत्या.हा भावूक क्षण कोणाच्याही वाट्याला न येवो अशाच त्या प्रार्थना करत होत्या.तितक्यात नवऱ्या मुलाचे बाप सखाराम नानांकडे आले होते.तुमच्या मुलीला माझ्या मुलीसारखे ठेवेल काहीच चिंता करू नका अशा समजावणीच्या सुरात समजावले होते.शेवटी किती ही केले तरी तुम्ही कन्यादान करत आहात.असे म्हणून नवरदेव व वऱ्हाड मंदिरासमोर वरात करण्यासाठी आले होते.रात्र भर वरात करून सकाळी दोन्ही ही नवरा बायकोच्या आंघोळी उरकल्या तेव्हाच अनुसया नववधू म्हणून सासरी निघाली होती.पण पार्वती या नावाने कारण तिच्या घरमालकाचे नाव शंकर होते. तिचे नाव बदलेले होते.शंकर पार्वतीचा हा जोडा उभ्या संसारात उठून दिसत होता.असे हे वडिलांनी केलेले कन्यादान तिला चित्रपटाच्या रीळ प्रमाणे पुढे सरकत असताना दिसत होते.


