
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील खडकवाडी,लोणी,वाळुंजनगर, वडगावपीर, लाखनगाव, पोंदेवाडी,धामणी,रानमळा मांदळेवाडी येथे बुधवार (दि.०१) दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा,गहू,जनावरांचे खाद्य तसेच वाळुंजनगर येथे वीस मेंढ्यांचा गारांच्या माराने मृत्यू झाला.काही ठिकाणी घरांच्या भिंतीवर पोल्ट्रीच्या भिंती कोसळल्या आहेत.
खडकवाडी येथील भैरवनाथ यात्रेचा दुसऱ्या दिवशी बुधवारी अवकाळी आलेल्या पावसाने यात्रेतील आलेल्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर कुस्त्यांचा आखाडा रद्द करावा लागला आलेल्या पैलवान खेळाडूंना खडकवाडी ग्रामस्थांकडून जाण्याचे व येण्याचे भाडे देण्यात आले.पाळण्यावाले इतरांना आर्थिक मदत देण्यात आली.
कपड्याचे व्यापारी, व्यवसायिक इतरही दुकानदारांचे नुकसान झाले.दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची अवकाळी आलेल्या पावसामुळे तारांबळ झाली.असे खडकवाडीचे मा.सरपंच अनिल डोके यांनी सांगितले.
पूर्व भागात झालेल्या गारपिटाची पाहणी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णूकाका हिंगे, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. व प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याचे सांगितले आहे.
वाळुंजनगरच्या मेंढपाळाला व शेतमालाच्या झालेला नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी भगवान शिनलकर, बाळासाहेब वाळुंज पाटील, सतीश रोडे पाटील, तसेच वाळुंजनगरचे माजी उपसरपंच महेंद्र वाळुंज व जयेश वाळूत यांनी केली आहे.

वाळूंजनगर (ता.आंबेगाव ) येथे कांदा व फ्लॉवर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हे दाखवितााना शेतकरी.


