
पंचनामा प्रतिनिधी – देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेपैकी एक प्रक्रिया म्हणजे जनगणना असल्याचं म्हंटलं जातं. अशातच आज पासून अर्थात 1 एप्रिलपासून देशात जनगणना करण्यास सुरुवात होणार आहे. तब्बल 15 वर्षांनंतर देशात जनगणना होणार असून, ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. सोबतच हि जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती आणि गृहनिर्माण माहिती गोळा केली जाईल. १ एप्रिलपासून नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, तर 16 एप्रिलपासून अधिकारी घराघरात जाऊन माहिती संकलन करतील. घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यांची माहिती यामध्ये घेतली जाणार आहे.
◼️देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना होणार, दोन टप्प्यांत पार पडणार
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. यामध्ये वय, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर यासह जातीनिहाय माहिती देखील गोळा केली जाणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान पहिला टप्पा पार पडणार असून, देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 6.3 लाखांहून अधिक गावे यांचा ही समावेश असेल. सोबतच लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना विवाहित मानले जाणार असल्याचा मोठा निर्णय देखील या संदर्भात घेण्यात आला आहे. एकूण 33 प्रश्न यंदा जनगणनेसाठी निच्छित केले आहे. दरम्यान हे प्रश्न नेमके कोणते हे आपण समजून घेऊ.
◼️जनगणनेदरम्यान विचारले जाणारे 33 प्रश्न
घराचा क्रमांक काय आहे?
कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक.?
कुटुंबप्रमुखाचे लिंग काय आहे?
जात कोणती आहे : सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय (OBC)?
कुटुंबात किती सदस्य आहेत?
कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे?
घराची मालकी कोणत्या स्थितीत आहे?
घरात किती खोल्या आहेत?
शौचालय आहे का?
शौचालयाचा प्रकार कोणता आहे?
सांडपाणी निचरा व्यवस्था आहे का?
पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे?
विजेचा स्रोत कोणता आहे?
बाथरूम आहे का?
घरात गॅस कनेक्शन आहे का?
घरात टीव्ही आहे का?
इंटरनेटची सोय आहे का?
घरात रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का?
स्वयंपाकासाठी मुख्य इंधन कोणते आहे?
तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का?
खालीलपैकी टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन कोणता आहे?
तुमच्याकडे सायकल, स्कूटर किंवा मोटरसायकल आहे का?
तुमच्याकडे कोणती कार, जीप किंवा व्हॅन आहे?
तुमचे मुख्य अन्न कोणते आहे?
तुमचा इमारत क्रमांक किंवा जनगणना क्रमांक काय आहे?
घराचा वापर.?
घराची स्थिती.?
घराच्या फरशीसाठी वापरलेले मुख्य साहित्य कोणते. म्हणजेच, फरशी सिमेंट, ग्रॅनाइट किंवा मार्बलची आहे का?
घराच्या भिंतींमध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
घराच्या छतामध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
कुटुंबप्रमुख या प्रश्नांची उत्तरे गणकाला देतील. गणक ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल. कुटुंबप्रमुखाची माहिती ऑनलाइन देखील गोळा केली जाईल.
◼️जनगणनेचं महत्त्व :
जनगणनेतून जी माहिती उपलब्ध होईल ती धोरण ठरवण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनासाठी फायदेशीर होईल. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघांच्या फेररचनेसाठी आणि आरक्षण निश्चितीसाठी जनगणनेच्या डेटाचा वापर होईल. संशोधकांना देखील या माहितीचा फायदा होईल.


