
पंचनामा प्रतिनिधी – चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा,पर्यावरणाचा समतोल राखण्यात चिमण्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी टीव्हीएस श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (TVS SST) च्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे ‘जागतिक चिमणी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.निसर्ग संवर्धन आणि प्रबोधनाचा हा अनोखा उपक्रम ग्रामस्थांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी TVS SST चे प्रतिनिधी नवनाथ राक्षे व सिंधू वायकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत केले. शुभदा बोरुडे आणि सुशांत पावले यांनी आपल्या शैलीदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.
या दिनाचे औचित्य साधून पहाडदरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. “माझी लाडकी चिमणी” या विषयावर विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.
तज्ज्ञांकडून संवर्धनाचे आवाहन
धामणी वनपरिक्षेत्रातील वनपाल सौ निलम चव्हाण यांनी चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

“चिमणी हा आपला सखा आहे, तिला वाचवणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी भगवान शेठ वाघ आणि मुख्याध्यापक मंगेश जवळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
टीव्हीएस कंपनीच्या वतीने पहाडदरा गावठाण मध्ये 56 चिमण्यांची घरटे बसवण्यात आली.या कार्यक्रमाला वनविभागाच्या अस्मिता शिंदे, पूजा कांबळे, योगेश विधाटे, दिलीप वाघ, कल्पेश बडेकर, गोविंद वाघ, अशोक जाधव यांच्यासह सरपंच श्री. मच्छिंद्र वाघ, ग्रामसेवक सौ.सोनाली जाधव, भाऊसाहेब कुरकुटे, रवींद्र विधाटे, अंगणवाडी सेविका नंदा वाघ, मदतनीस रंजना कुरकुटे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टतर्फे सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. निसर्गप्रेमींकडून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.


