आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रॉयल रायडर्सचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न!!

रॉयल रायडर्सचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न!!

नाशिक (वार्ताहर):- रॉयल रायडर्स आयोजित नाशिक ते रायगड सायकल साहस मोहीम कृतज्ञता व डिसेंबर डिस्टन्स चॅलेंज गौरव सोहळा नुकताच नाशिकच्या ग्रामसेवक भवन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण कुमार खाबिया होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर सुरगाणा संस्थानाच्या स्नुषा सोनालीराजे पवार यांच्यासह निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शहाजीराजे राजोळे, कैलास वाकचौरे, शैलेंद्र कुलकर्णी, राज लुथरा, प्रकाश दोंदे, राजेंद्र कोटमे पाटील, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी सोनालीराजे पवार यांनी रायगड राईड आणि डिसेंबर चॅलेंजमध्ये सर्व सहभागी रायडर्सचे कौतुक करत ऐतिहासिक राईडचे आयोजन केल्याबद्दल रॉयल परीवाराचे अभिनंदन केले. रॉयल परिवाराचे कार्य कौतुकास्पद असून सतत वेगवेगळ्या राईडचे आयोजन केले जाते, आरोग्यासाठी ही नक्कीच चांगली बाब आहे, भविष्यात साहसी राईडचे आयोजन करावे, असे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी यावेळी सांगितले.

नाशिक ते रायगड हे 311 किमीचे अंतर 100 रायडर्सने नाशिक, शहापूर, कर्जत, पाली, पाचाडमार्गे दोनच दिवसात सायकलवर पार करत रायगडावर यशस्वी चढाई केली. सर्व रायडर्सला सन्मानचिन्ह व मावळी पगडी देऊन गौरविण्यात आले. तर 1 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान व्हर्च्युअल चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील 336 रायडर्स ने सहभाग घेतला. यात सर्व रायडर मिळून 2,64,500 किमी सायकलिंग केली. पुरुष गटात प्रथम राजन जैन लुधियाना (2735 किमी), द्वितीय गोपाल अग्रवाल आग्रा (2405 किमी) तृतीय संदीप दराडे नाशिक (2379 किमी) हे तर महिला गटात प्रथम राजकिशोरी लांडगे श्रीगोंदा (2733 किमी) व सुवर्णा देशमुख नाशिक ( 2684 किमी) या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह सह मेडल, ग्लोव्हज, हेल्मेट, सायकल पाऊच , किट पाऊच, डिकेथलॉन सॅक, पाणी बॉटल, बंडाना देऊन तर सर्व फिनिशर ला आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले.

रायगड रायडरच्या वतीने अशोक काळे, हिराबाई कानवडे यांनी आणि डिसेंबर चॅलेंजचे विजेते संदीप दराडे, सुवर्णा देशमुख, संदीप दराडे आणि रायडर्सच्यावतीने भाऊसाहेब खेतमाळीस यांनी मनोगत केले. गायत्री सोनजे व राजनंदिनी रसाळ यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. लुथरा एजन्सी, ए टू झेड सायकल्स, जे एस फिनसोल्युशन्स नाशिक, लुधियाना सायकल्स संभाजी नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र राजोळे यांनी व आभार प्रदर्शन सुभाष कु-हे यांनी केले.

यावेळी पसायदान, छत्रपती शिवाजी महाराज व स्व.गुलाबबाई खाबिया यांचे प्रतिमापूज करण्यात आले. कार्यक्रमात नाशिक सोबत सिन्नर, येवला, संगमनेर, नारायणगाव, श्रीगोंदा, निफाड येथील रायडर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रॉयल टेक्निकल टीमसोबत राजेंद्र राऊत, सचिन पाटील, अभिजीत शिंदे, प्रवीण सुरसे, विनोद बनकर, विशाल शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.

नाशिक येथील ग्रामसेवक भवनात रॉयल रायडर्सचा सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित सोनालीराजे पवार, प्रवीण खाबिया, कैलास वाकचौरे व रॉयल रायडर्स टीम.!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.