आरोग्य व शिक्षणसामाजिक

आमच्या शिरदाळे(ता.आंबेगाव) गावची तहान भागवणारा गाव तलाव होतो आहे झपाट्याने रिकामा!!

आमच्या शिरदाळे(ता.आंबेगाव) गावची तहान भागवणारा गाव तलाव होतो आहे झपाट्याने रिकामा!!

शब्दांकन- श्री.मयूर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे)

आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असणारे डोंगरावर वसलेले आमचे शिरदाळे गाव!!गावच्या उत्तरेला असलेले तळे म्हणजेच आमच्या शिरदाळे गावची ओळख!!याच तळ्याच्या आधारे शेकडो वर्षे आमचं गाव या डोंगरावर वास्तव्यास आहे. परंतु काळ बदलला तसे गावात राहणाऱ्या लोकांची संख्या देखील घटत गेली.परंतु बाहेर गेलेल्या प्रत्येकाची नाळ ही गावाशी आजही तशीच जोडलेली असल्याचे पाहायला मिळते!!

आमच्या गावचे वैशिष्ट्य म्हणजे हे असणारे तळे!! एक- दोन अपवाद सोडले तर आज पर्यंत कधीच पूर्णपणे आटलेले नाही.शिवाय उन्हाळ्यात देखील कायम पाणी असल्याने आजूबाजूच्या परिसरातील जनावरे,शेळ्या,मेंढ्या,धनगर समाजाच्या मेंढ्यांचे कळप हे कायम याठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात. शिवाय तळ्यात मासे असल्याने शेजारील ठाकर समाजाचे अनेक लोक मासे पकडण्यासाठी येत असतात.ग्रामस्थ देखील वर्षभर याच पाण्याच्या वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत असतात.

यंदा मात्र पाऊस कमी पडल्यामुळे पावसाळ्यात तळ्यात कमी प्रमाणात पाणी आले.त्यात जानेवारी महिन्यातच तळ्यात पन्नास टक्के पेक्षा कमी साठा असल्याने आणि अजून उन्हाळा तोंडावर असल्याने त्यात बाष्पीभवनाचा देखील परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामुळे यंदा पाणी शेवटपर्यंत पुरेल की नाही याची शास्वती नाही.

या तळ्यातील पाणी फक्त घरगुती आणि जनावरे यांना वापरण्यासाठी असते. शेतीसाठी पाण्याची सुविधा नसल्याने दोन पिकांची शेती झाल्यावर आमच्या गावचा शेतकरी हा उन्हाळभर मात्र मोकळा असतो.मग ग्रामीण संस्कृती असल्याने शेजारील गावच्या यात्रा,बैलगाडा शर्यती,इतर विरंगुळे यात मग्न असतात.तर महिला वर्ग मजुरीने बागायती परिसरात उन्हाळभर दुसऱ्याच्या बांधावर राबत असतात.ही सवयच जणू सर्वांना अंगवळणी पडली आहे.हे जर असेच चालू राहिले तर भविष्यात आमचं डौलदार असणारं “शिरदाळे” गाव फक्त नकाशावर राहिले तर नवल वाटायला नको.हे तळं मात्र कायम येणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवण्याचे काम करत राहणार आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.