कोपरगावात विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न!!
कोपरगावात विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न!!
कोपरगाव मध्ये रूढी परंपरेला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक विधवा महिलांनी सहभाग नोंदवून एकमेकींना हळदी कुंकू लावला.
या कार्यक्रमास ब्रह्मकुमारी सरला दीदी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आघाव साहेब, महिला व बाल विकास अधिकारी धुमाळ मॅडम, समुपदेशक वैशाली झाल्टे, समाज कल्याण अधिकारी कुलकर्णी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. गावित्रे म्हणाले की समाजामध्ये विधवा महिलांना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही रूढी परंपरेच्या नावाखाली त्यांना डावलून अपमानित केले जाते. त्यामुळे अशा विधवा महिलांमध्ये न्यूनगंड तयार होऊन त्या निराशेच्या गर्तेत जाण्याची दाट शक्यता असते असे होऊ नये म्हणून अशा विधवा महिलांना मानसन्मान मिळावा समाजामध्ये त्यांना ताठ मानेने जगता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्या साताळकर, योगिता देवडे, शोभा पवार, रायरीकर मॅडम व रश्मी मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेक महिलांना गहिवरून आले. समाजाकडून कशाप्रकारे त्रास दिला जातो याचे अनेक उदाहरण त्यांनी दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण खरात , गावित्रे मॅडम , बजाज सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विधवा महिलांनी एकमेकाकींच्या संपर्कात राहून एकमेकींना अडचणीच्या वेळी मदत करण्याची शपथ घेतली. सर्व विधवा महिलांना वाण व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.