आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खडकवाडीचा गौरव!!! दगडाच्या जागी त्याच्या हाती टेकवले पुस्तक!! गावभर उनाडकी करणारा’ गौर्‍या ‘ भाषण करु लागतो तेव्हा..! जिल्हा परिषद शाळेची किमया!!

साभार लेख -कु.दिक्षा गुलाबशेठ वाळुंज माजी विद्यार्थी जि.प.शाळा खडकवाडी

खडकवाडीचा गौरव!!!
दगडाच्या जागी त्याच्या हाती टेकवले पुस्तक!!
गावभर उनाडकी करणारा’ गौर्‍या ‘ भाषण करु लागतो तेव्हा..!
जिल्हा परिषद शाळेची किमया!!

गावभर स्वैरभैर फिरणारा, कुणालाही दगड मारून पळणारा, वाया गेलेलं पोरग म्हणून ज्याच्या जवळही कुणी थांबत नव्हतं. तो गौर्‍या आता खणखणीत मराठी वाचू लागलाय. शिव्या नव्हे तर भाषण ठोकु लागलाय. द्वेष नव्हे तर मैत्री जपू लागलाय आणि ही किमया साधली आहे खडकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने अन् तिथल्या शिक्षकानी.

शहरी भागातील खाजगी शाळांचे पेव ग्रामीण भागात आले अन् गावचं कधी व्हिलेज झालं समजलच नाही. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घसरू लागली. मरगळ झटकून अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळांत, शिक्षण पद्धतीत असा काही बदल केला की इंग्रजी शाळांच्या दारी रांगेत उभी राहणारी पालक आता जिल्हा परिषद शाळांचं कौतुक करू लागली आहे. याचं कारण आहे गौर्‍या अर्थात कु.गौरव सुक्रे सारख्या शेकडो मुलांच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल.
पालकांना कामा अभावी न मिळणारा वेळ आणि समाजात बैल गाड्याचा नाद यामध्ये गुरफटलेल्या कुटुंबातील गौरव. नाव गौरव असल तरी गावात गौर्‍या म्हणून प्रसिद्ध. गावातील काही उनाड पोरांनी गौर्‍या ला अपशब्द द्यायला प्रोत्साहित केलं. गौर्‍या ला जवळ घेऊन कुणी समजून सांगावं अशी कुणाची इच्छाच नव्हती कारण त्याला चिडवून आनंद घेण्यात मजा वाटायची. वाह्यात पोरग म्हणून गावाने द्वेष केल्याने त्याच्याही मनी कधी चांगल्या विचारांनी जागा घेतलीच नाही.
२०२१ सालात गौर्‍याचा प्रवेश गावच्या जि. प. शाळेत झाला. प्रेम, मार्गदर्शन, संस्कार या तिन्ही गोष्टींना हे लेकरू पोरक असल्याचं शिक्षक समिर जाधव सर यांच्या लक्षात आल. गौरव च दुपारचं जेवण आता जाधव सरांच्या डब्यात सुरू झालं. शेवटच्या बाकावरून तो पहिल्या बाकावर आला. अभ्यासातील त्याच्या थोड्या प्रगतीच शिक्षक मनभरुन कौतुक करू लागले. त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीत जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. परिणाम म्हणून चौथीत शिकणारा अल्लड गौर्‍या आता प्रेम, मैत्री, आदर, जिव्हाळा ह्या शब्दांच्या भोवती फिरू लागला आहे. हातातील दगडांची जागा पुस्तकाने, शिव्यांची जागा सुविचारांनी, द्वेषाची जागा मैत्रीने घेतली आहे. याच सर्व श्रेय ग्रामस्थ, शिक्षक समीर जाधव सर यांना देत शाब्बास सर..! असच म्हणत आहे .

फॅन्ड्री चित्रपटात जब्याने व्यवस्थेवर फेकून मारलेला दगड भोवतालच्या हतबलतेचं प्रतीक होता. इथे गौर्‍याच्या हातातील दगडाची जागा पुस्तकांनी घेतली. शिव्यांची जागा भाषणानी, द्वेषाची जागा मैत्रीने घेतली आहे. हे जिल्हा परिषद शाळांचं यशच म्हणावं लागेल. गौरवचा सकारात्मक प्रवास असाच सुरू राहण्यासाठी भोवतालाने देखील त्याच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा अन्यथा पुस्तकांची जागा पुन्हा दगड घेईल जो भिरकवला जाईल व्यवस्थेच्या तोंडावर हतबलतेतून.
गौर्‍या उर्फ गौरव च्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणारे शिक्षक श्री.समिर जाधव सर, मुख्याद्यापक वाळुंज सर आणि नाटे मॅडम यांना ग्रामस्थांनकडुन मन:पूर्वक धन्यवाद.….

कु.दिक्षा गुलाबशेठ वाळुंज माजी विद्यार्थी जि.प.शाळा खडकवाडी

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.