शिरदाळे-धामणी,लोणी-शिरदाळे घाटातील घनदाट झाडीने वाढले अपघाताचे प्रमाण !!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – यंदा पाऊस मुबलक झाल्यामुळे जंगलाची झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.एका दृष्टीने निसर्ग संपतीमध्ये वाढ होत आहे ही एक चांगली गोष्ट आहे.जंगलतोड थांबल्यामुळे दऱ्याखोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल झाले आहे.परंतु शिरदाळे धामणी घाट असेल किंव्हा लोणी शिरदाळे घाट असेल या घाट रस्त्यात देखील अनेक झाडे रस्त्यावर आल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.ही झाडी एवढी घनदाट आहे की वाहन जवळ आले तरी लक्षात येत नाही.त्यामुळे अपघात होत आहेत.नुकताच शिरदाळे गावातील एक तरुण या अपघातात चांगलाच जखमी झाला आहे.असे अनेक अपघात होताना पाहायला मिळत आहे.

लोणी शिरदाळे घाटात तर अविरतपने सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे छोट्या वाहनांना घाट रस्त्यात गाडी आलेली देखील दिसत नाही.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित ही झाडी काढून टाकावी अशी मागणी शिरदाळे गावच्या सरपंच सौ. सुप्रिया तांबे,उपसरपंच श्री.बिपीन चौधरी,मा.सरपंच वंदना तांबे,मा.जयश्री तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.

शिरदाळे धामणी रस्त्याने आमच्या गावातील अनेक शाळकरी मुलं येत जात असतात.झाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेले गवत एवढे वाढले आहे की,त्यात एखादा बिबट्या बसलेला असला तरी कळणार नाही.कारण या दोन्ही घाटांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असून भर दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे.त्यामुळे हा धोका देखील मोठा आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पंचायत समितीचे मा.सदस्य रवींद्र करंजखेले, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील,मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,सोसायटी संचालक जयदीप चौधरी यांनी केली आहे.

जंगल दाट झाल्यामुळे शिरदाळे,धामणी,लोणी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे.परिसरात घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे या घाटातील झाडी त्वरित काढावी अशी सर्वच ग्रामस्थांची विनंती संबंधित विभागाला असणार आहे.तसे झाले नाही तर नागरिक स्वतः कुऱ्हाड हातात घेऊन ही झाडी आणि गवत कमी करावे लागेल.

घाट परिसरात आधीच अरुंद रस्ता आहे.त्यात झाडी आणि गवत रस्त्यात आल्याने समोरून आलेले वाहन अजिबात दिसत नाही.त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत.नुकताच एक तरुण सहकारी गंभीर जखमी झाला आहे.त्यात शाळेतील विद्यार्थी याच रस्त्याने येत जात असतात अपघाताची भीती आणि दाट जंगलामुळे बिबट्याची भीती देखील आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित ही झाडी कमी करावी.तसेच लोणी शिरदाळे घाटात देखील तीच परिस्थिती आहे.त्या रस्त्याने अवजड वाहतूक होत असते.समोरून येणारी छोटी वाहने झाडीमुळे लवकर दिसत नाहीत त्यामुळे त्या घाटातील झाडी देखील कमी करण्याची गरज असल्याचे शिरदाळे गावचे मा.उपसरपंच श्री.मयुर संभाजी सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.
