आरोग्य व शिक्षणसामाजिक

निगडाळे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी कथाकथन कार्यक्रम आणि पालकांसाठी संस्कार मार्गदर्शन मेळावा संपन्न!!

पंचनामा भीमाशंकर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी आणि कथामाला राज्य उपाध्यक्षा वैशालीताई गाढवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कथाकथन कार्यक्रम आणि पालकांसाठी संस्कार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे राज्याध्यक्ष श्यामराव कराळे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे,उपसरपंच नितीन लोहकरे,वनसमिती अध्यक्षा अनिता लोहकरे,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड,केंद्रप्रमुख निळकंठ कोरडे,मुख्याध्यपिका शोभा जाधव,शिक्षक संतोष थोरात,प्रतिभा पवार विदयालय पुणेचे शिक्षक उद्धव डेरे,अंगणवाडी मदतनीस लीलाबाई लोहकरे,निलेश लोहकरे,सेवानिवृत्त शिक्षिका विजया कराळे, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना कथामाला राज्याध्यक्ष कराळे गुरुजी यांनी पालकांना घरगुती वातावरणात मुलांवर संस्कार कसे करावेत,मोबाईल व टीव्ही यांचा अतिरेक टाळावा,मुलांशी प्रेमाने संवाद साधावा आणि मुलांना चांगल्या गोष्टी वाचायला व ऐकायला द्याव्यात,सानेगुरुजींच्या कथांमधील मानवतेचा संदेश आजच्या काळात महत्त्वाचा असून विद्यार्थी व पालकांनी सानेगुरुजींचे आदर्श विचार आत्मसात करावे याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड,कथाकथनाची कला आणि सानेगुरुजींच्या विचारांचे संवर्धन करणे हा होता.उपस्थित मान्यवर आणि पालकांनी सानेगुरुजी कथामालेच्या या उपक्रमाचे कौतुक करून या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी,आत्मविश्वास निर्माण होऊन पालकांना मुलांच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन पालक राहुल गायकवाड,अनंता भोमाळे,चिंधाबाई लोहकरे,योगिता भोमाळे,कमल कुऱ्हाडे,हिराबाई केंगले,वेणूबाई तिटकारे,अंजना पवार,अंकुश लोहकरे यांनी केले.प्रास्ताविक व स्वागत शिक्षक संतोष थोरात आणि आभार मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.