ताज्या घडामोडीसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव) च्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात खंडोबाच्या नवरात्राची घटस्थापना!!

धामणी(ता.आंबेगाव) च्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात खंडोबाच्या नवरात्राची घटस्थापना!!

धामणी (ता.आंबेगांव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी व देवदिपावलीच्या उत्सवाला बुधवार (दि.१३)सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

पहाटे खंडेरायाची नित्य पुजा व महाआरती झाल्यानंतर मुख्य गाभार्‍यात भगत,तांबे,वाघे,वीर, सेवेकरी,भाविक व ग्रामस्थाच्या वतीने पूजारी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,शांताराम भगत,प्रभाकर भगत राजेश भगत,माउली जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे, दिनेश जाधव,नामदेव वीर यांनी खंडोबा,म्हाळसाई,बाणाई व जोगेश्वरीची पूजा करुन या विलोभनीय मूर्तीना आकर्षक पोषाख घालण्यात आला.त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला.

त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास धार्मिक विधीसह घटस्थापना करण्यात आली.यावेळी धामणी,शिरदाळे,गावडेवाडी,महाळुंगे पडवळ,लोणी,खडकवाडी येथील भाविक उपस्थित होते.

चंपाषष्ठी हा कुलाचार आहे मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्ठी हे खंडोबाचे नवरात्र असते त्याला “षडरात्र ” किंवा “पंचरात्र” असे म्हणतात देवीच्या नवरात्राप्रमाणेच हे चंपाषष्ठीचे व्रत करतात.या सहा दिवसातच मार्तंडभैरव व मणिमल्ल यांचे घनघोर युध्द झाले असून ते षडरात्र या कालावधीत साजरे केले जाते. या प्रतिपदेच्या दिवशी धामणी,शिरदाळे,पहाडदरा व पंचक्रोशीतील गावामध्ये प्रत्येक भाविकांच्या घरी घट बसविले जातात. तांब्याचा कलश धान्याच्या राशीवर ठेवून त्यात विड्याची पाच पाने ठेवतात. घट बसविल्यानंतर पानांची माळ घालण्यात येते. घटाच्या उजव्या बाजूला खंडोबाचा टाक नागवेलीच्या पानावर विराजमान करतात. तर घटाच्या डाव्या बाजूला जोडपानावर म्हाळसाईच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवतात. तर घटाच्या उजव्या बाजूला जोडपानावर बानाईच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवून त्याचे पूजन करण्यात येते.त्यानंतर रोज फुलांची माळ घातली जाते.

या षडरात्र काळात मल्हारी महात्म्य,मार्तंड भैरव या ग्रंथाचे घरोघरी पारायण केले जाते. षड्रात्र उत्सवात खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावण्यात येते. पूजेत देवाला भंडार वाहतात. या सहा दिवसाचा महिला भाविक उपवास करतात.

सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला अधिक महत्व आहे. याच दिवशी भैरवाने मल्लासूराचा वध केला. भूतलावरील अरिष्ट टळले. या दिवसाला त्यामुळे चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी असे म्हणतात.चंपाषष्ठीला या विजयोत्सवात देवगणांनी स्वर्गातून मार्तंड भैरवावर भंडारा बरोबर चंपावृष्टी अर्थात चाफ्याच्या फुलांची उधळण केली म्हणून मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. या दिवशी घट उठविले जातात.या दिवशी देवाला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या नैवेद्याबरोबर ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यामध्ये दही व मीठ घालून केलेला पदार्थ) कणकेचा रोडगा,वांग्याचे भरीत,पातीचा कांदा,व लसूण याचाही नैवेद्यात समावेष असतो.त्याचप्रमाणे काही ठिकाणी चंपाषष्ठीला गव्हाच्या लोंब्या,तीळ व गूळ हे पदार्थ एकत्र करुन त्याचा दिवा करुन त्यात फुलवात लावतात असे यावेळी देवाचे सेवेकरी भगत व वाघे मंडळीनी सांगितले.

खंडोबा मंदिरात व शिखरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आलेली आहे.चंपाषष्ठीला (१८डिंसेबर सोमवारी ) मंदिरात पंचक्रोशीतील भाविक पाच नामाची जागरणे मोठ्या प्रमाणावर घालत असतात.या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते.येथील चंपाषष्ठी उत्सव समिती व ग्रामस्थाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे देवस्थानाचे मुख्य पूजारी दादाभाऊ भगत यांनी यावेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.