आरोग्य व शिक्षणसामाजिक

श्रीगोंदा शुगर शाळेच्या वतीने शिस्तप्रिय उपक्रमशील शिक्षकाला निरोप!!

श्रीगोंदा शुगर शाळेच्या वतीने शिस्तप्रिय उपक्रमशील शिक्षकाला निरोप!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर येथील उपक्रमशील शिक्षक विजयकुमार लंके यांची पेडगाव जुने येथे पदोन्नतीने बदली झाल्यामुळे शाळेच्या वतीने सपत्नीक सन्मान करून निरोप देण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विजय लंके सरांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पदमा शिर्के-पाचपुते मॅडम यांनी लंके सरांनी केलेल्या शाळेच्या विकास कामांची माहिती सर्वांना दिली. उपक्रमशील शिक्षक लंके सर यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आणि ते यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यास खुप मोठी मदत झाली.शाळेच्या परिसरात वृक्षारोपण हा महत्त्वपूर्ण उपक्रम लंके सरांनी राबविल्यामुळे आज शाळेचा परिसर हिरवळीने नटून गेला आहे, अशा शब्दात मुख्याध्यापकांनी लंके सरांचे कामाचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी लंके सरांनी केलेल्या कार्याचा भरभरून उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला.

यावेळी अनेक विद्यार्थी भावुक झाले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सीमा साळवे मॅडम यांनी स्वीकारले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये लंके सरांनी शाळेच्या विकासासाठी केलेले काम तसेच त्यांच्या स्वभावातील चांगले गुण उलगडून सांगितले.

तसेच यावेळी लिंपणगाव केंद्राचा नव्याने पदभार केंद्रप्रमुख पदभार स्वीकारलेल्या अलका भालेकर – दरेकर मॅडम यांचाही शाळेच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

या निरोप आणि स्वागत कार्यक्रमासाठी आवर्जून इंदिरा गांधी विद्यालयाचे चे मुख्याध्यापक गवळी सर, शाळेच्या माजी शिक्षिका शेख मॅडम, दरेकर सर, सुरेश हराळ सर, वेठेकर सर यांनीही आणि मोठया संख्येने पालक उपस्थित होते. तसेच प्रामुख्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप कोकाटे, उपाध्यक्ष दत्तात्रय घालमे, सदस्य निलेश जगताप, सचिन गोंटे, मधुकर काळाणे, सानप मॅडम, कांबळे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते किरण कुरूमकर, अमोल राऊत, दिपक दांडगे हेही उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी लंके सरांचा कार्याचा आणि त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा गौरव आपल्या भाषणात केला.

लंके सरांनी सत्काराला उत्तर देताना शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याशी असणारे ऋणानुबंध सदैव टिकून राहतील अशी ग्वाही दिली. वेळोवेळी सर्वांच्या सुख -दुःखात सहभागी होण्याचे व सदैव मदतीला तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल ऋण व्यक्त केले. केंद्रप्रमुख भालेकर मॅडम यांनी सत्काराबद्दल शाळेचे आभार व्यक्त केले आणि शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक रवींद्र होले सर यांनी केले . त्यांनी लंके सरांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडून सांगितले. सर्व उपस्थितांचे आभार शाळेतील शिक्षक संदीप हिरवे सर यांनी मानले. त्यांनी लंके सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका डोंगरे मॅडम, पाचंगणे मॅडम, वेठेकर मॅडम व पऱ्हे मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना गहिवरून आले होते. सर्वांनी हळव्या मनाने आपले आवडते शिक्षक लंके सर यांना निरोप दिला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.