
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील लोणी–जारकरवाडी मार्गे मंचरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ढोबळेवाडी फाट्याजवळ महावितरणच्या ठेकेदारामार्फत अवघ्या तीन महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला नवीन विद्युत खांब तिरपा झाला आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत झुकलेल्या या खांबामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महावितरणच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ढोबळेवाडी फाट्याजवळील या मार्गावरून दररोज लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यालगत विद्युत खांब तिरपा झाल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खांब अचानक कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच नवीन विद्युत वाहिनीचे काम करण्यात आले होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतच नवीन खांब तिरपा झाल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खांब उभारताना योग्य पद्धतीने काम करण्यात आले होते का? आवश्यक ती सुरक्षितता आणि मजबुतीची काळजी घेण्यात आली होती का? तसेच काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली होती का? असे सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.

संभाव्य अपघाताची वाट न पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून तिरपा झालेला विद्युत खांब सरळ व सुरक्षित करावा. तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.

