
पंचनामा प्रतिनिधी – तीर्थक्षेत्र आळंदी (ता. खेड) येथील पुणे जिल्हा मातंग समाज धर्मशाळेत सम्राट चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त अजामेळा दिंडी क्रमांक २६च्या वतीने बुधवार, दि. २ डिसेंबर ते रविवार, दि. ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची माहिती अजामेळा दिंडी क्रमांक २६चे सरचिटणीस तथा सप्ताहाचे संयोजक ह.भ.प. पत्रकार श्री. मधुकर महाराज गायकवाड यांनी आदर्श गाव गावडेवाडी येथे दिली.
या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती व भजन, सकाळी ७ ते ९ श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते ११ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ७ ते ९ श्रीहरी कीर्तन व त्यानंतर हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
प्रवचनकारांची लाभणार सेवा
या सप्ताहामध्ये ह.भ.प. गणेश महाराज हिंगे (अवसरी बुद्रुक), ह.भ.प. संभाजी साहेब लोंढे (पुणे), ह.भ.प. प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड (मंचर), ह.भ.प. श्री. पंढरीनाथ तांबे सर (अवसरी खुर्द), ह.भ.प. बाळासाहेब लोंढे सर (राजगुरुनगर), ह.भ.प. नानासाहेब लोंढे सर (राजगुरुनगर), ह.भ.प. डॉ. हेमलता नंदकुमार सोळवंडे (काळेवाडी, पुणे) आणि ह.भ.प. रवींद्र महाराज कांबळे (पुणे) यांची प्रवचनसेवा होणार आहे.
कीर्तनकारांची हरिनाम सेवा
तसेच ह.भ.प. संतोष महाराज गावडे (आदर्श गाव गावडेवाडी), ह.भ.प. दत्तात्रय महाराज रूकारी (कोल्हारवाडी), ह.भ.प. भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे, संगीत अलंकार (वारू, ता. मावळ) आणि ह.भ.प. तान्हाजी महाराज तांबे (शिरदाळे, ता. आंबेगाव) यांची वारकरी सांप्रदायिक कीर्तनसेवा होणार आहे.
या सप्ताहाची सांगता रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी सप्ताहाचे संयोजक ह.भ.प. पत्रकार श्री. मधुकर निवृत्ती महाराज गायकवाड (आदर्श गाव गावडेवाडी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व दहीहंडी फोडून होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन व हरिनाम श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजामेळा दिंडी क्रमांक २६चे अधिकारी व पदाधिकारी तसेच पुणे जिल्हा मातंग समाज धर्मशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.



