
पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील पंढरीनाथ किसन सुक्रे (वय ४४) यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटात मित्रपरिवाराने माणुसकीचे दर्शन घडवत मदतीचा हात पुढे केला. मित्रांच्या आवाहनाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल पावणेपाच लाख रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता. ७) औरंगपूर ते पारगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात पंढरीनाथ सुक्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मा. सरपंच अनिल डोके, मा. उपसरपंच एकनाथ सुक्रे, सोमनाथ सुक्रे , विठ्ठल सुक्रे , धनंजय शिंदे, संतोष रामा सुक्रे, नाथा सुक्रे, संजय सुक्रे,विशाल वाळुंज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मित्र, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि विविध मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पुणे म्हाडाचे सभापती तथा मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २१ हजार रुपये, खडकवाडीतील माजी विद्यार्थ्यांनी ५८ हजार रुपये, विशाल वाळुंज मित्र मंडळाने ५१ हजार रुपये मदत दिली. तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. दत्तात्रय बाबुराव पोखरकर यांनी २२ हजार, औरंगपूर मित्र मंडळाने १८ हजार, रमेश येवले यांनी १५ हजार, सुभाष लंके यांनी १५ हजार, अरुण गिरे यांनी पाच हजार, सुरेश भोर यांनी पाच हजार आणि अतुल डोके यांनी पाच हजार रुपयांचे योगदान दिले.
जमा झालेली एकूण मदतीची रक्कम पंढरीनाथ सुक्रे यांच्या पत्नीच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे, अशी माहिती माजी सरपंच अनिल डोके यांनी दिली.
दुःखाच्या प्रसंगी मित्रपरिवाराने दाखविलेली एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना खऱ्या अर्थाने आदर्श ठरली आहे. केवळ आर्थिक मदत न करता मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णयही या उपक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करणारा आहे.



