सामाजिक

धामणीत खंडोबाची पारंपरिक दवणा-फूल महापूजा उत्साहात संपन्न !!

1011469360
1011469360

१७ चिरंजीव यजमानांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक; भक्तिमय वातावरणात भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

पंचनामा प्रतिनिधी मंचर : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) खंडेरायाची पारंपरिक दवणा, फुले व फळांनी महापूजा उत्साहात संपन्न झाली. आश्विन महिन्यातील आकाशदीप, दीपदान, कुलधर्म, लक्ष्मी व इंद्रपूजन, अन्वाधान आणि कार्तिक स्नानारंभ या धार्मिक पर्वांच्या निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगासह खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या सर्वांगसुंदर व लोभस मुखवट्यांना दुग्धाभिषेक आणि पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात १७ चिरंजीव यजमानांच्या हस्ते दवणा, फुले व फळांनी महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे सुवासिक फुलांनी सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग तसेच पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडाऱ्याचा लेप लावण्यात आला होता. खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या वस्त्रालंकारांनी सजवलेल्या लोभस मूर्ती, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि मोगरा व दवण्याच्या सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

मंदिर परिसरात ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करणारे भाविक, आबालवृद्धांची उपस्थिती आणि महिलांचा लक्षणीय सहभाग यामुळे धार्मिक उत्साहाला विशेष रंगत आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात व सभामंडपात मोगरा, झेंडू आणि अॅस्टरच्या फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या मंडपात व शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

1011469384

या धार्मिक विधीमध्ये धनेश बढेकर, हर्षद बढेकर, साहिल बढेकर, प्रतीक राजेंद्र जाधव, अक्षय दीपक जाधव, रोहित संदीप जाधव, विक्रम महादेव जाधव, यश गाढवे, सिद्धार्थ तांबे, अक्षय अविनाश बढेकर, प्रथमेश अशोक जाधव, आदित्य गणेश भगत, किरण रोकडे, सुजल ज्ञानेश्वर विधाटे, अनिकेत चौधरी, सिद्धेश घोलप आणि हर्षद दत्तात्रय गाढवे या १७ चिरंजीव यजमानांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला.

अभिषेकानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, राजेश भगत आणि राहुल भगत यांनी स्वयंभू सप्तशिवलिंगावर सुगंधी वनस्पती, दवणा, फुले व फळे पारंपरिक पद्धतीने अर्पण केली. त्यानंतर आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. रुद्राभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.

1011469390

खंडोबाच्या दर्शनासाठी तळेगाव ढमढरे, महाळुंगे पडवळ, लोणी, खडकवाडी, जारकरवाडी, गावडेवाडी, गुंजाळवाडी आणि बेल्हे येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. पारंपरिक धार्मिक विधी, फुलांची सजावट, सुगंधी दवण्याचा दरवळ आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषामुळे श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

1011434447

Related posts

पंचनामा विशेष – साने गुरुजी

Chief Editor

धामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदनउटी !!

Chief Editor

धामणीत खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment