सामाजिक

धामणीत खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात संपन्न !!

1010733893

पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) येथील खंडोबा देवस्थान मंदिराच्या प्रांगणात श्रावण पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात, भंडारा व खोबरे उधळत खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शुक्रवारी पहाटे श्रावण पौर्णिमेला (राखी पौर्णिमा) खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत, नामदेव भगत, अनिरुद्ध वाळूंज तसेच महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व बाणाईच्या पंचधातूच्या लोभसवाण्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप दिला. त्यावर सुगंधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली पिवळीधम्मक हळद लावण्यात आली.

1010733896

श्री खंडोबा व बाणाई यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. खंडोबा व बाणाईच्या देखण्या मूर्तींना बाशिंग व मुंडावळ्या बांधण्यात आल्या. त्यानंतर आकर्षक वस्त्रालंकाराने सजवलेल्या तसेच बाशिंग व मुंडावळ्या बांधलेल्या खंडोबा व बाणाईच्या मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता ही मिरवणूक मंदिरात विसावली.

मंदिराच्या आवारात नवरदेव खंडोबाच्या मुखवट्याचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर सनई, तुतारी व ढोलाच्या निनादात बाशिंग-मुंडावळ्या घातलेला व हिरवी साडी परिधान केलेला, वस्त्रालंकाराने सजवलेला बाणाईचा मुखवटा सेवेकरी मंडळींनी मंदिरातून लग्नमंडपात वाजतगाजत आणला.

1010733893

यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. खंडोबा व बाणाईच्या मुखवट्यांवर फुलांच्या पाकळ्या, अक्षता व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करत खंडोबा-बाणाईचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे, पोपट भोजने, गणपत भोजने, गणेश जारकड,भाऊ भोजने यांनी केले. यावेळी सेवेकरी, मानकरी मंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

दगडी दीपमाळेच्या कामाचा शुभारंभ

खंडोबा मंदिराच्या दोन्ही महाद्वारांच्या बाजूला दगडी दीपमाळ उभारण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. येणाऱ्या चंपाषष्ठीपर्यंत दीपमाळेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी सांगितले.

1010725335
1010690614

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे राबविला गेला अनोखा अन अभिमानास्पद सोहळा !!

Chief Editor

धामणी नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी शताब्दी महोत्सव ; भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन; नामवंत कीर्तनकारांची किर्तन सेवा होणार संपन्न !!

Chief Editor

ब्रेम्बो इंडिया आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment