
पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे
हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे यांनी केले आहे. यासाठी शेतकरी सुभाष गोरडे यांच्या शेतात प्रकाश सापळा उभारून त्याचे प्रात्यक्षिक सादर करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पहिल्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमिनीतून बाहेर पडतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात. या कालावधीत प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने भुंगेऱ्यांचे संकलन केल्यास त्यांची संख्या कमी होऊन पुढील काळातील हुमणीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मोठी मदत होते.
हा उपाय कमी खर्चिक, पर्यावरणपुरक आणि प्रभावी असतो.
हुमणीची अळी ऊसाच्या मुळ्या व भूमिगत कोंब कुरतडून खाते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, ऊस वाळू लागतो आणि अनेक ठिकाणी लागवडीत रिकाम्या जागा निर्माण होतात. यामुळे शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे सामूहिक रित्या उभारून हुमणीच्या भुंगेरांना वेळेत नष्ट करावे.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद भोर यांनी घरगुती बियाण्याची उगवण क्षमता, बीज प्रक्रिया , बीबीएफ,एल निनो आणि महाडीबीटी अंतर्गत एससी, एसटी व सर्वसाधारण शेतकऱ्यांनी अर्ज करावे या विषयी माहिती दिली.
सदर मोहिमेदरम्यान मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव, उपकृषी अधिकारी अरुण जोरी, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव. आणि परिसरातील शेतकरी, विनायक गोरडे, समीर गोरडे, किशोर गोरडे, प्रवीण गोरडे, संतोष गोरडे, अतुल गोरडे, सुशीला गोरडे उपस्थित होते.


