काठापूर बुद्रूक (ता.आंबेगाव) येथील गणेश वस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ,जेष्ठ दांपत्य जखमी!!


काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील गणेशवस्तीवर ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर भागा जाधव व कमल ज्ञानेश्वर जाधव यांच्या घरी रात्री एक वाजता चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोनही उभयते जखमी झाले असुन अंदाजे सहा ते सात तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील गणेशवस्तीवर ज्ञानेश्वर भागा जाधव (वय ७५) व कमल ज्ञानेश्वर जाधव (वय ७०) हे राहतात.शनिवार पहाटे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमाघील बाजूची खिडकीची लोखंडी जाळी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.त्यानंतर आतील रूममधून हॉलमध्ये येऊन त्या ठिकाणी झोपलेल्या उभयतांवर हल्ला करून जखमी केल.यावेळी कमल जाधव यांच्या गळ्यातील सोने चोरण्याचा प्रयत्न करत असताना कमल जाधव यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण करत त्यांना जखमी केले.यामध्ये त्यांचा पाय मोडला आहे.तर ज्ञानेश्वर जाधव यांनी ही प्रतिकार केल्याने त्यांच्याही पाठीवर चोरट्यांनी मारलेले आहे.सदर घटना घडल्या नंतर चोरटे निघून गेल्यावर जखमी ज्ञानेश्वर जाधव यांनी नवनाथ जाधव यांना फोन करून घटनेची माहिती दिली.त्यानंतर वस्तीवरील सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घुले ॲम्बुलन्स मधुन जखमी उभयतांना पारगाव (शिंगवे) येथील ओम हॉस्पिटल या ठिकाणी भरती करण्यात आले आहे.
काठापुर या ठिकाणी असणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे गावामध्ये रात्री विज नव्हती. त्यामुळे अनेक नागरिकांना चोरी झाल्यानंतर घराबाहेर येने धोक्याचे वाटत होते. अंधारामुळे बाहेर काहीच दिसत नव्हते.त्यामुळे अजूनच अडचण निर्माण झाली.चोरी झालेल्या घराच्या पाठीमागे पावसामुळे चोरट्यांचे पायाचे ठसे दिसून येत आहे.
सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक घाबरले असून नागरिकांमध्ये भीती आहे.सदर ठिकाणी रात्रीच पारगाव पोलीस स्टेशनच्या वतीने भेट देण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.