आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मांदळेवाडी,लोणी,वडगावपीर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट!!

मांदळेवाडी,लोणी,वडगावपीर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातल्या वडगावपीर,मांदळेवाडी,लोणी परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या भागात पोलिसांनी आपली गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वी मांदळेवाडी येथील ढगेस्थळ मधील हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दोन मोठ्या समया व स्पीकरचे साहित्य असे एकूण अंदाजे 35 ते 40 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. तसेच रामदास ढगे यांची पाच एच.पी. ची विद्युत मोटार चोरट्याने चोरून नेली होती.याशिवाय पालेकर वस्ती येथे पोलीस पाटील काळुराम पालेकर यांची विद्युत मोटारीची 50 फूट केबल देखील चोरीला गेली होती.

लोणी(धामणी ) येथे चार दिवसांपूर्वी शांताराम गायकवाड यांची दुचाकी गाडी चोरट्यांनी लंपास केली.मारुती विष्णू सिनलकर,दगडू भूमकर यांच्या घरातून रोख रक्कम आणि तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने देखील चोरीला गेले आहेत. चोरीचे वाढते प्रमाण व रात्री अवकाशातील ड्रोनच्या गिरट्या यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी या भागात गस्त घालावी अशी मागणी लोणीचे सरपंच सावळेराम नाईक,वडगावपीरच्या सरपंच मीरा पोखरकर,मा. सरपंच संजय पोखरकर, मांदळेवाडीच्या सरपंच उज्वला आदक, उपसरपंच रवींद्र आदक व येथील ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच स्थानिक नागरिकांना कोणी संशयास्पद आढळले तर त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केल्याची माहिती पारगाव पोलिसांनी दिली आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.