आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

मी शौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ!! 🖋️लेखन/शब्दांकन युवाव्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे मंचर,पुणे.

मी शौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ!!

🖋️ लेखन /शब्दांकन
युवाव्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे.
मंचर,पुणे.
८०८७९४४६४२/७४९९३२४३४७.

इसवी सन१६०० च्या कालखंडात महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आघाडीवर होता शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता .एक काळ असा होता बाईचा मनगटातील कंकन जरी वाजले तरी पुरुषांना भल्या पहाटे जाग यायची परंतु आज काळच इतका बदलला आहे की पुरुषांना लाथा घातल्या तरी त्यांना जाग येत नाही, व्यसनाच्या आहारी गेलेला आजचा तरुण वर्ग ही शोकांतिकाच झाली आहे. एकेकाळच्या मावळ्यांच्या हातामध्ये दुधाचे प्याले होते परंतु आजच्या घडीचा तरुण व्यसनांच्या आहारी मद्यधुंद दारूच्या नशेत बुडला आहे त्याला जाग येत नाही.कधी काळी याच माती मध्ये पराक्रमाच्या शौर्याच्या कथा घडल्या. बारा बलुतेदार मावळ्यांनी आणि अठरापगड जातीच्या शूरविरांनी इतिहास घडवला .हा इतिहास परंपरेचा वारसा आहे.
या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास अनेक विरांनी रणविरानी गाजवला. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन इतिहासाच्या पानापानावर इतिहासातील रण मर्दानी स्त्रिया देखील मागे राहिल्या नाहीत .शिवसाम्राज्य या भूमीवर येऊन आज साडेतीनशे वर्षे हून अधिक काळ गेला आहे. एकेकाळी या भूमीतील माणसांची अवस्था ही जनावरांपेक्षा बत्तर होती. शिवस्वराज्य येण्याअगोदर या महाराष्ट्राच्या उरावर अनेक परकीय सत्ता थया थया नाचत होत्या. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. गरिबांना कोणी कैवारी राहिला नव्हता. शेतकऱ्यांच्या शेतात धान्य पिकत नव्हत, तरुण मुलींवर अन्याय-अत्याचाराचं तांडव माजलं होतं. सकल मराठा विखुरला गेला होता.अशातच एक पेटती क्रांतीची मशाल धगधगत्या क्रांतीची मशाल घेऊन वादळाच्या वेगाने पुढे आली. जुलमी राजवटीला मोडून काढून स्वतंत्र मराठा बहुजनांचे अठरा पगड जातींचे,बारा बलुतेदारांचे स्वराज्य साम्राज्य उभे व्हावे ही संकल्पना तिच्या मनात जाज्वल्य प्रकाशाप्रमाणे येऊ लागली. मराठ्यांच्या बहुजनांच्या सर्व जाती धर्माच्या स्वराज्याची संकल्पना जगात जागविणारी एक विरश्री वीरांगना, धीरोदात्त वीरांगणा, कन्या राष्ट्रप्रेरीका , राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्माला आल्या. इसवी सन १५९८ साली १२ जानेवारी या दिवशी सोनेरी पावलांनी जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. जाधव कुळी घराण्यात मुलगी जन्माला आली. म्हणून वडील लखुजी राजे जाधव आणि आई माळसा राणी यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. जिजाऊ रूपवान, करारी बाणा ,शास्त्र शस्त्र निपून आणि चपळ धीट बालवयातच होत्या .जिजाऊंचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जाधव घरातील कन्या भोसल्यांची सुन झाली आणि शहाजीराजांचा संसार सोन्या परी उजळला. त्याच वेळी समाजाची दुर्दैवी अवस्था होती. निजामशाही, कुतुबशाही ,आदिलशाही मोगलशाही, अशा अनेक परकीय सत्ता या भूमीवर अधिराज्य करत होत्या. आपले बहुजन मराठा मावळे,अठरापगड जातीच्या धर्माची माणसे त्यांना एकत्र करून स्वतंत्र साम्राज्य व्हावे ही संकल्पना जिजाऊंच्या आणि स्वराज्य संकल्पक शहाजी राजांच्या मनात आली .याच संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी याच स्वराज्य प्रेरिकाच्या गर्भात एका झुंजाराची रीत उदयाला आली. बहुजनांचा स्वराज्य रक्षण , प्रजापती दक्ष, शेतकऱ्यांचा पाठीराखा तारणहार ,आईबापाचा आज्ञाधारक आणि समग्र बहुजन साम्राज्याचा छत्रपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी माता जननी राजमाता मासाहेब जिजाऊ ! संस्कारक्षम कार्यकर्तृत्व असणाऱ्या जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याला घडण्यासाठी समग्र आयुष्य खर्ची घातले. स्वराज्य रक्षण करण्यासाठी तत्पर असनाऱ्या जिजाऊ अनेक प्रसंगावरून आपणास अनुभवण्यास मिळतात.शिवबा राजे आपली धर्मपत्नी सोडली तर समाजात असलेली हरेक स्त्री ही आई आणि ताई समान आहे तिला तशीच वागणूक देण्याची शिकवण आई जिजाऊंचीच! खान संपला आपले वैरही संपले आता मेल्याल्याची वैरभावना कसली. जा शिवबा आल्या पावले माघारी जा आणि त्या खानाची कबर बांधा आणि सर्व खर्च स्वराज्यातून करा हे सांगणार्या राजमाता जिजाऊसाहेब! शिवबा खानाचा भेटीच्या दरम्यान तुमच्याशी काही दगाफटका केल्यास स्वराज्याची चिंता नसावी आम्ही शंभूराजांना हाताशी धरून स्वराज्याचा कारभार पाहू असे ठणकावून सांगणार्‍या स्वराज्य निष्ठावंत असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब! देसाई गडी जिंकल्यानंतर सावित्री देसाई या परस्त्री पर मातेला तान्या बाळा सहित समोर आणून तिला बहिणी सम सन्मान देवून साडीचोळी देऊन भावासारखा पाठीराखा शिवबा राजा झाला ही शिकवण हे संस्कार कोणाचे? तर राजमाता जिजाऊ मासाहेबांचेच!
जिजाऊंच्या पोटी अन्य दुसराही कुठला जीव जन्मास आला असता तरी देखील तो जीव शिवबा राजाचं झाला असता .जिजाऊंनी बाल शिवबास संस्कार दिले त्याची योग्य मशागत केली.त्याचे फलित म्हणून त्याच तत्परतेने पुढे शिवरायांनी स्वराज्याचे सुराज्य केले.जो गुन्ह्यास पात्र तो शिक्षेस पात्र शिव शासनाची प्रचिती आपल्यास रांझे गावच्या पाटलाच्या प्रसंगावरून सरळ दिसून येईल. राज्याभिषेकावेळी आई जिजाऊ शिवबाना म्हणतात शिवबा ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, मोठ केलं तसेच या शेतकऱ्यांना या प्रजेला सांभाळा शिवबा! या शेतकऱ्यांना कधी भिकेचे डोहाळे लागता कामा नयेत! म्हणून शिवराय आपल्या लढाऊ मावळ्यांना नेहमी सांगत तलवारी जरूर काढा परंतु माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये ही शिकवण मासाहेब जिजाऊ यांचीच. अनिष्ट रूढी परंपरा यांना थारा देऊ नका ज्या परंपरा ंधारातून प्रकाशाकडे समाजाला प्रजेला नेतात त्याच आपल्याला मान्य आहेत असे ठणकावून सांगितले राजमाता जिजाऊ यांनी. वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी किल्ले तोरणा गड जिंकल्यावर स्वराज्यात सामील केल्यानंतर सापडलेल्या सुवर्णमूर्ती आणि सुवर्णमुद्रा या सार्‍या वितळून मिळेल तो सर्व पैसा स्वराज्याच्या ,रयतेच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कामी लावा . उरलेला पैसा गडकोट किल्ल्यांच्या डागडुजीच्या कारनी लावा. यावरून मासाहेब जिजाऊ यांनी अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही हे स्पष्ट होते. कुठलीही जात धर्म पंथ आणि माणसे या स्वराज्याचे शत्रू नाहीत जो स्वराज्याला खीळ घालतो तोच स्वराज्याचा खरा शत्रु त्याची नांगी ठेचा शिवबा! आणि म्हणूनच आजही ही साडेतीनशे वर्षांच्या काळानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आजही मुस्लिम मावळ्यांसाठी, बांधवांसाठी मज्जित तर मराठा बहुजनांसाठी बांधवांसाठी मंदिरे पहावयास मिळतात. धर्मनिरपेक्ष राजा शिवछत्रपती अशी ओळख शिवरायांची झाली.

जिजाऊ मासाहेब नेहमीच शिवरायांसाठी स्वराज्यासाठी स्वराज्यातील हरेक जीवासाठी मावळ यासाठी तरुणासाठी तरुणी साठी ज्ञात-अज्ञात अबला सबला व्यक्तींसाठी अखंड तेवणारा अक्षय अमृताचा झरा आहेत जी जाऊन सारखे शौर्य अनेक कर्तृत्व या मातीत जन्माला आले आणि ही माती पवित्र पावन झाली ती अजरामर झाली.आजच्या घडीला शिवबा राजे जन्माला यावे असे फक्त म्हणून चालणार नाही त्यासाठी प्रत्येक आईने आधी जिजाऊ व्हावे आणि बापाने शहाजीराजे व्हावे तर आणि तरच जन्माला येतील ते शिवबा राजे! एक गोष्ट लक्षात ठेवा हजारो दिव्यांना जन्म देणारी एक पण ती असते ज्याप्रमाणे जिजाऊ जन्माला आल्या आणि मग आपणास शिवाजी राजांचे कर्तृत्व पहावयास मिळाले अनुभवयास मिळाले. म्हणूनच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा! स्त्री भ्रुणहत्या थांबवा. हा सदाचार मना मनात रुजवा!
याच कर्तृत्ववान शौर्यवान धैर्यवान विरांगणा राजमाता जिजाऊ यांची अखेर प्राणज्योत १७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील वाड्यात मावळली.जिजाऊ ह्या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी त्यांनी दिलेली शिकवण संस्कार आपल्या कणाकणात आहेत.

महाराष्ट्राच्या वाघीण ह्या
भगव्याच्या रक्षिका आहेत
दुबळ्या समजु नका ह्यांना
या शिवरायांच्या जिजाऊ आहेत!

जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभुराजे जय गडकोट!!!

लेखन /शब्दांकन
सुप्रसिद्ध युवा व्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे.
पुणे.

व्याख्यान आयोजनासाठी आपणही संपर्क करू शकता. ८०८७९४४६४२/७४९९३२४३४७.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.