आरोग्य व शिक्षणसामाजिक

एक इन्कमिंग बंद झाला…महिन्यातून एखादा तरी फोन नक्कीच यायचा त्याचा…फोन येण्याची वेळ,साधारण दुपारी 4 वाजता…सप्टेंबर महिन्यात तीनचार वेळा आला फोन त्याचा…अगदी शेवटी 22 सप्टेंबरला आणि तेच त्याच्याशी झालेलं शेवटचं बोलणं….!

मोहन वामने
8087459030
इंदिरा एकादशी,
भाद्रपद वद्य एकादशी,
10 ऑक्टोबर 23

एक इन्कमिंग बंद झाला…

महिन्यातून एखादा तरी फोन नक्कीच यायचा त्याचा. फोन येण्याची वेळ, साधारण दुपारी 4 वाजता…..!सप्टेंबर महिन्यात तीनचार वेळा आला फोन त्याचा. अगदी शेवटी 22 सप्टेंबरला आणि तेच त्याच्याशी झालेलं शेवटचं बोलणं….!

निमित्त होतं माझ्या वाढदिवसाचे, खरं तर 21 सप्टेंबर, माझा वाढदिवस, दर वर्षी फोन यायचाच, पण यावर्षी विसरला…..!दुसऱ्या दिवशी फोन करुन बोलला, शुभेच्छा दिल्या, 15 -20 मिनिट वेगवेगळ्या विषयांवर बोललो…..!कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, हेच आपलं शेवटचं बोलणं ठरेल….!मूळ गावं खडकवाडी, धामणी पासून 3 किलोमीटर अंतरावर, वाडीत हायस्कुल नसल्याने जवळील लोणी गावातील हायस्कुल मध्ये प्रवेश न घेता धामणीच्या शिवाजी विद्यालयात प्रवेश घेतला ….त्याकाळी धामणीच्या हायस्कूलचा लौकिक खूप दैदीप्यमान होताच, कर्मवीर अण्णाच्या; रयत शिक्षण संस्थेचं हायस्कुल, तेथूनच त्याची धामणीशी जवळीक वाढली….!वर्गात हुशार विद्यार्थी म्हणून जे काही थोडे विद्यार्थी गणले जात, त्यापैकी तो एक…..!

माझ्या मागे दोन वर्षे, परंतु “जयहिंद वाचनालय” हा आमच्या मैत्रीतील दुवा होता, “वाचन वेड” हीच आमच्यातील मैत्रीची सुरुवात होती…..!तसा त्याचा त्या काळी जास्त मित्रांचा गोतावळा नव्हता, त्याच्या वर्गातील निवडक काही आणि क्लासमेंट सोडून जे अजुन काही असतील त्यापैकी मी एक….!बारावी शास्त्र पास झाल्यानंतर कॉलेजला पुण्यात ऍडमिशन मिळाल्यानंतर तो खूप बदलला,मूळचे आम्ही “ग्रामीण”, आमचे शब्दोच्चार अजूनही तसेंच पण पुण्यात आल्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेता घेता त्यानं पहिलं शिक्षण घेतलं ते आपल्या बोली भाषेतील शब्दोच्चाराचं…..!

कदाचित त्याच्या शैक्षणिक विद्वत्तेबरोबरच त्याने स्वतः मध्ये केलेल्या काळानुरूप शब्दोच्चारातील बदल, हेच त्याच्या आतापर्यंतच्या सर्वं यशाचे गमक असावे….!नाही म्हणायला “सदाशिवा” तील त्याच वास्तव्य हे सुद्धा त्याला कारणीभूत असू शकत….!शिक्षण संपल्यानंतर त्याचा राजगुरूनगर मधील प्राध्यापकी पासून, कालपर्यंतच्या डहाणूकरच्या प्राचार्य पर्यंतच्या प्रवासात त्याची विद्वत्ता नेहमीच उंचीवर राहिली…..!त्याच्या बाबतीत अनेकांचे अनेक समज -गैरसमज होते…..!सर्वांशीच तो मनमोकळे करुन बोलेल असं नव्हतं, म्हणून तो काहींच्या नजरेत गर्विष्ठ भासायचा, काहींना तो अबोल वाटायचा पण वस्तुस्थिती तशी नव्हती, कोणाशी काय बोलावं याचं भान त्याला होतं…..!

मन मोकळे करुन बोलायची काही निवडक ठिकाणं होती त्याची, ज्यांच्याकडे तो त्याच्या मनातील सर्वं प्रकारच्या भावना व्यक्त करीत असे, कदाचित त्यापैकी मी एक असावा…..!शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय विषयात त्याची काही विशिष्ट मतं होती, माझ्या बरोबर बोलताना ती त्याची मतं नेहमीच प्रकट होतं असतं….!आमच्यात काही मतामध्ये विरोधाभास सुद्धा असे, पण तो त्यासाठी आग्रही भूमिका ठेऊन वादविवाद करीत नसे…..!

आणि म्हणूनच माझ्यालेखी तो विद्वान होता…..!

यात्रेच्या निमित्त धामणीला आवर्जून घरी येऊन गप्पा मारणे, एखाद्या लग्न समारंभात भेटणं कधी त्यानं टाळलं नाही….!शालेय जीवनातील ज्ञानू, माउली झाला, माऊलीचा सर झाला, सरांचा, “ओ डॉक्टर ” झाला कधी? ते कळलंच नाही….!त्याला जेव्हा स्टॅटिस्टिक मधील “डॉक्टरेट ” मिळाली, तेव्हा आमच्यातील अंगभूत खडूस पणाने त्याला जेव्हा मी “अहो डॉक्टर” म्हणू लागलो, तेव्हा अगदी कळवळून म्हणू लागला, “नको रे नको असं अहो जाहो करुस, एकतर आता असं एकेरीवर हाक मारणारे किती उरलेत आयुष्यात? तेव्हा तू तरी “ए माऊली” हाकारत जा मित्रा.”….!

खरं होतं त्याच, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करीत मुंबई मधील एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य पर्यंत मजल मारणे, सर्वसामान्य गोष्ट खचितच नव्हती, त्यात अभ्यास करुन मिळविलेली डॉक्टरेट आणि प्राचार्य पद यामुळेच तो अनेकांचा “अहो” झाला होता…..!अंगातील सर्वं सामान्य वृत्ती, मूळ उच्चपदावर पोहचून सुद्धा तो जमिनीवर पाय असणाराच होता. म्हणून त्याला अरे कारे करणारे खूप थोडे राहिले असावेत. म्हणून त्याचा मला अरे कारेचा आग्रह असावा….!

त्याची जवळीक तशी नेहमीच होती, पण “केशवायनम:”च्या रूपात ती अजुन घनिष्ठ झाली…..!आमचे सर्वांचे धामणीच्या शिवाजी जुनिअर कॉलेज मधील 12 वी शास्त्र पर्यंतचे गणिताचे शिक्षक श्री कर्णे सर यांचा तो आवडता विद्यार्थी इतपत नातं नव्हतं सरांशी त्याच….!त्याच स्वतःच लग्न श्री कर्णे सरांनी त्यांच्या एका स्टाफ मेम्बर असणाऱ्या शिक्षकांच्या मुलीबरोबर जमवून दिलं होतं. त्यामुळे त्या दोघांमधील जिव्हाळा आणि प्रेम एक शिक्षक आणि विद्यार्थी पर्यंत मर्यादित राहिलं नव्हतं. तर ते नातं आता वेगळ्याच वळणावर येऊन स्थिरावलं होतं…..!दुर्दैवाने सरांचे एका गंभीर आजारात अकाली निधन झालं. परंतु कर्णे घराण्यातील आपलं स्थान कायम ठेऊन कर्णे बाई आणि त्यांची मुलं मुलींशी मानसिक दिलासा देऊन शक्य होईल तितकं सांत्वन करण्याचे प्रयत्न त्याने केले होतेच….!

सरांच्या निधनानंतर सरांच्या आठवणी जागृत होऊन त्यानं सरांवरती एक लेख लिहिला होता….!

त्यावर अभिप्राय विचारण्यासाठी त्यानं मला तो लेख पाठवला होता. लेख उत्तम लिहिला होताच, त्यानिमित्ताने मला त्याच्या मधील लिखाण विषयी गुण समजले….!त्या लेखाच्या आधाराने त्यानं एक संकल्पना माझ्या समोर मांडली. सरांचे विद्यार्थी, ज्यांचा माझ्याशी संपर्क आहें अशा विद्यार्थी वर्गाला सरांविषयी च्या भावना लिहून घेऊन त्याची pdf फाईल बनवून प्रसिद्ध करू. अशी ती संकल्पना होती. मी होकार देऊन त्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्याला दिलं….!स्वतः तो, मदन रत्नपारखी, प्राचार्य लक्ष्मण वाळुंज सर, देवानंद जाधव, रोहिणीताई जाधव देशमुख, श्री विनायक कुलकर्णी, श्री ज्ञानेश्वर भूमकर, श्री दिलीप शेवाळे इत्यादी आजचे अनेक मान्यवर परंतु श्री कर्णे सरांचे शिष्य असणाऱ्या अडीच तीनशे विद्यार्थी वर्गाच्या सहाय्याने आणि श्रीमती कर्णे मॅडम यांच्या सहकार्याने, “केशवायनमः” या ग्रंथाची निर्मिती झाली….!एखाद्या विद्यार्थ्यांने किंवा विद्यार्थी समूहाने आपल्या गुरुसाठी व्यक्त केलेल्या भावना, गुरूंना वाहिलेली शाब्दिक श्रद्धांजली असलेली फक्त चार पाच पुस्तक बाजारात प्रकाशित झालेली असावीत…..!

त्यापैकीच एक “केशवायनमः “.
ग्रंथाचे “संपादक ” पद कर्णे सरांच्या सर्वं विद्यार्थी वर्गाच्या अनुमोदनाने त्याला द्यायचं ठरलं,…!

खरं पाहता कुठल्याही पुस्तकाचे संपादकपद खूप जबाबदारीचे असतं. पुस्तकातील लिखाणाची सर्वं जबाबदारी या पदावर आलेली असतें, काही वादग्रस्त लिखाणाची जबाबदारी सुद्धा संपादकाची असते,….!

आणि या ग्रंथात लिखाण करणारे सरांचे अनेक विद्यार्थी असले तरी लिहिलेलं लिखाण वाद निर्माण करणारे नाही ना, याची काळजी संपादकाला घ्यावी लागते,….!

ग्रंथासाठी आलेले सर्वं लेख अनेकदा वाचून, लिखाणात काही मुद्दे वादग्रस्त आहेत काय? असतील तर ते मूळ लेखकाला पटवून सांगून, ते डिलिट करुन लेख छापणे…..!

खरं तर यासाठी त्याच्याकडे पुर्ण वेळ असणं गरजेचं होतं. आपल्या प्राचार्य पदाच्या जबाबदारीतून केशवायनमः ची ही जबाबदारी स्विकारून आणि त्यासाठी वेळ देणं त्याला खरंच शक्य नव्हतं…..!

ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी कार्यकारी,संपादक मंडळासोबत अनेक ऑनलाईन मिटिंग, कधी पुण्यात येऊन समक्ष कराव्या लागणाऱ्या मिटिंग, पुस्तकं छपाई पासून ग्रंथ प्रकाशन पर्यंतचे कार्यक्रम नीट नेटका होणं, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणं, किती किती म्हणून जबाबदारी असते….!

पण त्यासाठी त्यानं कधीच टाळाटाळ न करता स्वतः उत्साह दाखवून आणि बाकी सर्वाना उत्साहित करून, “केशवायनमः “च्या ग्रंथ प्रकाशनचं कामं, श्री जब्बार पटेल, श्री नागनाथ कोतापल्ले सारख्या नामवंताना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करुन, पुण्यात,”टिळक स्मारक”च्या मोठया प्रांगणात प्रकाशन कार्यक्रम यशस्वी करणे सहजशक्य नव्हतं,…!

कर्णे सरांच्या अनेक विद्यार्थी वर्गाच्या सहकार्याने आणि अनेकांच्या बहुमोल मदतीने त्यानं हा ग्रंथ प्रकाशन सोहळा खुप सहजतेने यशस्वी करुन दाखविला…..!

आपल्या आई बाबतीत तो खुप हळवा होता….!

जेव्हा जेव्हा तो आमच्या घरी येत असे तेव्हा आमच्या आईशी “ज्ञानेश्वरीतील” काही ओवी बद्दल बोलत असे. माझ्या आईचा तो आवडता विषय, त्यासंबंधित चर्चा करणारे कुणी मिळाले तर ती त्याच्याशी मनमोकळे चर्चा करीत असे…..!

ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनावर त्याच बऱ्यापैकी वाचन होतं, त्यामुळे आई आणि तो यांच्यात चांगले संवाद होतं असे…..!

आपलं, एका प्रथितयश कॉलेज मधील प्राचार्य पदासोबत तो आपल्या कुटुंबियांसोबत सुद्धा सर्वांसारखाच आणि सर्वांईतकाच वेळ देऊन त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी वेळ देत होता….!

चि. नचिकेत आणि चि. सौं. का. सायलीच्या लग्नाच्या निमित्तानं ते आम्हा सर्वांना प्रकर्षाने जाणवलं….!

दीड दोन महिन्या पुर्वी सह्याद्री वाहिनी वरील एका चर्चासत्रामध्ये त्याला आमंत्रित केलं होतं, त्या कार्यक्रमात समाजातील स्त्रीपुरुष समानते बद्दलची आपली मतं त्यानं आग्रहपूर्वक मांडली होती…..!

पत्नी सुनीतासाठी तर त्याची स्त्री -पुरुष समानता ही तत्व तो आपल्या घरातच राबवीत होता….!

सुनीता एक शिक्षिका. तिची तिच्या नोकरीसाठी सकाळपासूनची रोजचीच धावपळ, या धावपळीत तिला थोडी तरी विश्रांती मिळावी म्हणून त्याचे प्रयत्न असतं….!

कॉलेजवरून घरी आल्यानंतर शक्य होईल ती आणि त्याला करता येणं शक्य असणारी अनेक कामं तो करीत असे. त्यामुळंच एक कुटुंब म्हणून कुटुंबातील सर्वजण एकमेकांना मदत करुन आपापसातील जिव्हाळा, प्रेम निरंतर ठेवीत असतं…..!

गप्पाच्या ओघात त्यानं अनेकदा आपल्या आई साठीच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या….!

आपण आईला हवा तितका वेळ देत नसल्याची खंत तो बोलून दाखवीत होता. जितकी शक्य आहें तितकी आईची सेवा तो नेहमीच करीत होता, तरी पण तो स्वतःला अतृप्त समजत होता…..!

त्याची आई आणि धामणीचं जयहिंद वाचनालय हे त्याचे खास जिव्हाळ्याचे विषय होते…..!

धामणीच्या जयहिंद वाचनालय पासून त्याची ज्ञानाची भूक वाढीस लागली असं तो नेहमी म्हणायचा…..!

वाचनालयासाठी भरीव असं काही तरी करायची इच्छा तो नेहमीच प्रकट करीत असे….!

ग्रंथप्रकाशन कार्यक्रमानंतर वाचनालयासाठी काहीतरी कार्यक्रम घेऊ असं तो म्हणत असे….!

काही कारणामुळे त्याची ती इच्छा अपूर्ण राहिली. भविष्यात त्याच्या या इच्छेचा विचार नक्कीच होईल अशी आशा आहें…..!

दरवर्षी 31 डिसेंबरला पंढरपूरला जाऊन विठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घेण्याची त्याची परंपरा होती. मध्यंतरीचा करोना काळ सोडला तर अगदी अलीकडे पर्यंत त्याची ती परंपरा अखंडित चालू होती…..!

आज, मला फोन आल्यावर “जय हरी” म्हणायचं संपलंय…..!

काळाच्या ओघात आज कोणाचे आवर्जून फोन येण्याच्या प्रमाणात खूप घट झालेली आहें, या पुर्वी आपण जगाच्या किति उपयोगी होतो माहिती नाही आज तरी तितकासा उपयोगी आहे असं मला वाटतं नाही, त्यामुळे आपल्याशी संवाद होण्याचं प्रमाण सुद्धा घटलं असावं….!

तरीही अजुन काहीजण आवर्जून फोन करुन प्रकृतीची चौकशी करतात,….!

त्याचा महिन्यातून दोन तीन वेळा आवर्जून फोन यायचाच…..!

माऊली, ज्ञानेश्वर मारुती डोके आज आपल्यात नाहीत.

आज जे थोडे इन्कमिंग कॉल होणारे होते, त्यापैकी एक कॉल कायमचा बंद झाला…..!

या लेखाद्वारे माऊली तुला शेवटचा,
! जय हरी !

 

मोहन वामने
8087459030

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.