आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने मारली दडी!! बळीराजा झाला चिंतातुर!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने मारली दडी!! बळीराजा झाला चिंतातुर!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आता पाऊस गायब झाल्याने पिकांची उगवण झाली नसून त्याला पावसाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
तालुक्याच्या पूर्व भागात निरगुडसर,मेंगडेवाडी, जारकरवाडी,लोणी,धामणी, पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर,लाखनगाव,काठापुर आदी गावात गेल्यावर्षी जुलै च्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला होता. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आले होते. मात्र चालू वर्षी परिस्थिती वेगळी झाली आहे. तालुक्याच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या प्रेरणांमुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी मोजक्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व आंबेगावात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत.ज्या ठिकाणी पावसाने थोडेफार हजेरी लावली तेथील शेतकऱ्यांनी मूग आणि सोयाबीनची पेरणी केलेली आहे.मात्र त्यांना आता जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरात पाऊस आला नाही तर पेरणी वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.