काठापूर बुद्रुक येथे विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळाला!!

काठापूर बुद्रुक येथे विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळाला!!
काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळाला असून मागील चार दिवसातील दुसरी तर महिनाभरातील तिसरी घटना असल्याने त्याचप्रमाणे कारखाने सुद्धा अजून महिनाभर सुरू होणार नसल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान सर्किट होऊन गट नंबर 139 मधील शेतकरी बबन फकीरा करंडे यांचा सव्वा एकर व परशुराम फकीरा करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळून गेला आहे.
मागील चार दिवसांपूर्वी काठापूर बुद्रुक या ठिकाणी 10 एकर ऊस जळून गेला होता पुन्हा एकदा अडीच एकर ऊस जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यापूर्वीही असाच ऊस जळाला होता. त्यामुळे मागील महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ऊसाला लागणाऱ्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
काठापूर बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या सब स्टेशन वरून परिसरातील गावांना वीज पुरवठा होतो. त्याचप्रमाणे काठापूर बुद्रुक येथे वीज पुरवठा होतो या ठिकाणी असणाऱ्या विजेच्या तारा व खांब अनेक वर्षांपूर्वीचे असल्याने अनेक ठिकाणी झोळ आले आहेत.पूर्वी पाण्याअभावी या परिसरातील शेती हंगामी बागायती होती त्यामुळे विजेचे खांब हे शेतातून गेले आहेत.
अनेक ठिकाणी वाढलेला ऊस हा तारांपर्यंत पोहचतो होतात. त्यामुळे काठापूर बुद्रुक गावातील वीजवाहक तारांची उंची वाढवून नवीन खांब टाकावेत अशी मागणी होत आहे. सदर घटनेचा पंचनामा तलाठी जितेंद्र शेजुळ यांनी केला असुन वीज वितरण कंपनीचे अधिकारी ,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे पोलीस पाटील अमोल करंडे,सुदर्शन करंडे यावेळी उपस्थित होते.