कोल्हापूर हीच कर्मभूमी -अभिनेते सचिन पिळगांवकर नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान!!
कोल्हापूर हीच कर्मभूमी -अभिनेते सचिन पिळगांवकर नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान!!
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त दिला जाणारा कलायात्री पुरस्कार
रंगकर्मी सचिन पिळगांवकरना देऊन सन्मानित केले. शाल,श्रीफळ,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ.सुजय पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत सचिनजी बोलत होते. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या रिजेक्शनमुळेच अनुभव घेऊन शिकण्याची प्रक्रिया अविरतपणे जपली पाहिजे असा सल्ला सचिन पिळगांवकरनी मुलाखती दरम्यान शाहू स्मारक भवन येथे नवोदित कलाकारांना दिला.
ज्या कोल्हापूरने नाकारले त्याच कलापूरात कलायात्री पुरस्काराने मला सन्मानित केले, म्हणजे
कोल्हापूर हीच माझी कर्मभूमी आहे. पंडित नेहरूंनी आपल्या कोटावरील गुलाबाचे फूल माझ्या
शेरवाणीला लावले अन ‘बडा बनोगे’ ही शाबासकी दिली. हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असे
सचिनजी म्हणाले. राजा परांजपे,हृषीकेश मुखर्जी,मीनाकुमारी यासोबत जयशंकर दानवेंसारखे गुरु
मला मिळाले. ‘ तू तू मैं मैं’ मधून माझी पत्नी सुप्रियाला मी पहिल्यांदा भांडखोर पत्नी म्हणून आणले
हे ऐकताच सभागृहात हशा पिकला. चित्रपटसृष्टीच्या ५० वर्षांचे साक्षीदार सचिनजींनी मुलाखतीतून
चित्रपटसृष्टीतील प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला. मुलाखतीच्या शेवटी आर.डी.बर्मन यांचे ‘बडे अच्छे लगते है, ये धरती ये नदिया’ हे गाणे स्वत: गाऊन प्रेक्षकांना खुश केले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवेंच्या ‘अब्द अब्द’ व ‘दिल शायराना’ या दोन पुस्तकांचे सचिनजींच्या हस्ते प्रकाशनही झाले.
राजदर्शन दानवेंनी आभार मानले. अनुपमा घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवर
उपस्थित होते.