सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर
सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे आणि राजुरी ग्रामपंचायत यांच्या वतीने नॉलेज कॉलेज व्हिलेज या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर नुकतेच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.बदलत्या हवामानात शेतीतील शाश्वतता टिकविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी आणि दिवसेंदिवस शेतीत होणारा तोटा कमी करण्यासाठी १० ड्रम थिअरी तंत्राची जोड शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला दिली तर शेती व्यवसाय निश्चितपणे फायदेशीर होईल या उद्देशाने नारायणगाव येथे शाश्वत फार्मिंग फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असे प्रतिपादन ज्येष्ठ द्राक्ष तज्ञ मंगेश भास्कर यांनी व्यक्त केले.
औचित्य होते समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे मार्फत नॉलेज-कॉलेज-व्हिलेज या संकल्पनेतून केंद्र आणि राज्य सरकारचे सेंद्रिय शेती धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके,सरपंच प्रियाताई हाडवळे,विविध कार्यकारी सोसायटी चे उपाध्यक्ष अविनाश पाटिल औटी,रंगदास स्वामी देवस्थान आणे चे अध्यक्ष विनायक आहेर,रामदास यादव,दत्तूनाना कणसे,भालचंद्र डुंबरे,दस्तगीर पठाण,ज्ञानेश्वर गटकळ,प्रगतशील बागायतदार मारुतीशेठ बोरचटे,बाळाजीशेठ डुंबरे,दत्ताशेठ हाडवळे,रमेश औटी,राजुशेठ औटी,तुकाराम शेठ डुंबरे,गोरक्षशेठ हाडवळे,संजय पिंगळे,भाऊसाहेब औटी,यशवंत औटी,वायकर भाऊसाहेब,बाळाजीशेठ औटी,सुदामशेठ हाडवळे तसेच राजुरी गावातील विविध पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
या प्रसंगी मंगेश भास्कर यांनी गेल्या काही वर्षांत द्राक्ष शेतीत बदललेली स्थित्यंतरे आणि शेतमालाच्या एकूणच उत्पादनावर भाष्य करताना विषमुक्त अन्नधान्य फळे-भाजीपाला निर्मिती करताना परसबाग लागवडीचा कार्यक्रम घरोघरी केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सेंद्रिय शेती हि काळाची गरज असून कॅन्सर,डायबेटीस सारख्या गंभीर आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर वनस्पतींपासून तयार केलेल्या अर्कांचा वापर करून नैसगिकरित्या विषमुक्त अन्न पिकवावे लागेल आणि त्याचा रोजच्या आहारात समावेश करावा लागेल असे मंगेश भास्कर म्हणाले.
यावेळी अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विषमुक्त शाश्वत शेती प्रकल्पाचे समर्थ गुरुकुलचा विद्यार्थी सार्थक आहेर याने सादरीकरण केले.या कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य ग्रामपंचायत राजुरी व विविध कार्यकारी सोसायटी राजुरी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी प्रास्ताविक तुषार आहेर यांनी तर आभार वल्लभ शेळके यांनी मानले.