
लेखन :बाळासाहेब मेदगे
9004564645
चैत्र महिना उजाडला होता.रानातील झाडा,झुडपा ना कोवळी पालवी फुटली होती.जुनी कपडे टाकून नवीन कपडे परिधान करण्यास त्यांना निसर्गाने दिली होती.हिरव्यागार शालूनी नवीन नवरी हळदीच्या बोहल्यावर बसते तद्दवत त्याप्रमाणे निसर्ग नटला होता.गणपतरावांनी नुकतीच चैती पूणव मोठ्या आनंदानी साजरी केली होती.कुलदैवत म्हणजे खंडोबा च्या दारी दरवर्षी आपली बैलगाडी जवळ जवळ पन्नास किलोमीटर घेऊन जात होते.घरादाराला सुख लाभण्यासाठी गणपत रावांचा नेहमी प्रयत्न असायचा.बैलगाडीच्या वरच्या भागावर बांबू च्या काठ्यांनी बनवलेले झाकण लावले जात होते.त्यामुळे ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळत होते. आपली सर्व शेतसरी चार ,चार, बैल लावून लोखंडी नांगराने नांगरून घेतली होती.भली भली ढेकळ शेतात दिसत होती.ऊन खाल्याने जमीन कसदार होते हे पुरत गणपतरावाना ठाव होते.शेतात ऑक्सीजन खेळतो त्या मुळे हि त्यांची खटाटोप होती.या वर्षी धनधान्ये खूप झालं होतं.पाडव्याला ब्राह्मणाने सांगितलेल्या गुरु प्रमाणे ते शेती करत होते.म्हणता म्हणता चैत्र सरला होता.वैशाखाच आगमन झाले होते.लगीन सराई मोठ्या धामधुमीत चालली होती.तीन तीन दिवसांचा तो लग्न सोहळा सगळ्या नातेवाईकाच्या उपस्थितीत पार पाडला जात होता.पिठलं आणि भात हेच जेवण त्या काळी असायचं परंतु कधी कोणाची तक्रार नसायची.आंब्याच्या ठाहल्याने सगळा मांडव सजला जात होता.पान सुपारी देत, घेत ,सगळा परिसर आनंद मय होऊन जात होता.गणपत रावांनी नातेवाईकांची लग्न उरकली होती.वैशाखाच ऊन मी म्हणत होते.रानातील गवत वाळून शेवटच्या घटका मोजत होते.गुरांना चारा नव्हता ,थोडी वैरण ठेवली होती ती पावसाळा लागल्यानंतर गुरांना कामी येणार होती.गणपत रावांचा एक उपक्रम ठरलेला होता,रोज कुठल्यातरी पिंपळाच्या झाडावर चढून पिंपळाच्या पानाने भरलेला भारा आपल्या दुभत्या म्हशीला आणून टाकायचा ,त्या म्हशीच्या दुधापासून मिळणाऱ्या पैशावर घरी चलती बनली होती. पाडव्याच्या नंतर तोडून ठेवलेल्या रापाने भाताच्या शेतात भाजनी केली होती.त्या ठिकाणी भाताची दाढि(रोप) टाकली जाणार होती.शेताची वजवणी करून झाली होती.शेतातील दगड गोटे बाजूला केले होते.इकडे गणपत रावांच्या कारभारणीने शेताच्या एका कोपऱ्यात झाकणयुक्त कुंपण केले होते.त्या मध्ये मिरचीचे बी टाकले होते.रोज सायंकाळी सूर्याच्या कोमल किरणांच्या सानिध्यात त्याला ती पाणी देत होती.असंख्य रोपे जन्माला येत होती.पावसाळा लागला की ती रोप मुळासकट काढून मग दुसऱ्या ठिकाणी लावून मिरचीचे पीक काढले जात होते.गणपत रावांनी रानातील पळसाच्या झाडाचा आसरा घेतला होता.त्याची हिरवीगार पाने काढून ती पाने ईरल्यावर लावली जात होती.जेणेकरून किती हि पाऊस आला तरी माणूस भिजत नव्हता.अशी चार ते पाच ईरली तयार केली होती. घराच्या बाजूला असलेले शेणखताचे आळे चांगलेच पिकलेले खत बनले होते.तीन दिवस गणपत राव बैलगाडीवर खत नेऊन आपल्या शेतात टाकत होते.रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगलेच म्हणून या खताचा थोडा हि भाग वाया न जाऊ देता थेट शेतात टाकले जात होते.येणाऱ्या पावसाळ्याची जोरात तयारी गणपत रावा प्रमाणे जो तो करत होता.भुईमुगाच्या शेंगा फोडून शेंगदाणे बियासाठी तयार केले जात होते.गणपत रावाच घर जुन्या गावटी कौलाच असल्या कारणाने गावातील दोन तीन जणांना मदतीला घेऊन त्याने ते शेकारून घेतले होते.अशी मदत एकमेकांना मोठ्या हौसेने सगळे करत होते. !!एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!अशी धारणा त्या काळात पाहायला मिळत होती.वैशाख संपत असताना जेष्ट मध्ये कधी पाऊस पडेल याचा नेम नव्हता शनिवारच्या बाजाराच्या दिवशी त्यानी आपली बैल गाडी जुंपली होती.पाऊस चालू झाल्यानंतर रस्त्याने बैलगाडी जात नसे म्हणून हा टोकाचा निर्णय घेतला होता.खिशात पैसे घेऊन गणपत राव बाजाराला निघाले होते.चार महिने पुरेल एवढा बाजार त्यांना करायचा होता.बारीक दाना घरातच पिकत असल्याने फक्त मसाल्याचे पदार्थ,सुखी मासळी,विळी कोयत्याला धार,अशा बारीख सारिक गोष्टीवर त्यांना जास्त लक्ष ठेवायला लागणार होते.आज बाजाराला गाडी आणता आली, नंतर चार महिने आणता येणार नाही याची त्यांना कल्पना होती.सुख्या मासळीला प्रथम प्राधान्य देत बोंबील,वाकट, सुकट, हे चार महिने पुरेल एवढे त्यांनी घेतले होते. घरी येऊन त्यांनी या मासळीचे बारीख तुकडे करून डब्बे भरून ठेवले होते.शेतातून आल्यानंतर बाई माणसाला तेच एक कालवनाच कोड सोडवता येत होते.!! स्रियांची जात आणि दिव्यातील वात हि सारखीच असते, स्वतःचा विचार कधीही न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत राहते !! अशी गणपत रावांची घरधणीनं संसार सांभाळत होती.तिने शेताच्या बांधावर वाल(फावटा), घेवडा यांच्या बिया लावण्यासाठी तयार ठेवल्या होत्या.वाडग्यात काकडी,दुधी भोपळा,कारले, दोडका ,लाल भोपळा यांच्या बिया जमऊन ठेवल्या होत्या.मृग नक्षत्र दारावर येऊन पोहचले होते.आपल्या शेतीवाडीला ,जनावरांना,घरातील माणसांना सुख लाभावे म्हणून आपल्याच शेतातील म्हसोबाला कापण्यासाठी चांगला थोरला कोंबडा राखून ठेवला होता.भोळ्या बाबड्या गणपत रावांची म्हसोबा वर श्रदा होती.शेजारच्या गावातील सोयऱ्याला बोलवून घेत मुसलमानाकडून कोंबडा कापून त्या दिवशी सगळ्या परिवाराने कोंबड्यावर ताव मारला होता.आकाशात काळे ढग दिसू लागले होते.सकाळपासून उकाडा चालू झाला होता.सायंकाळी चार च्या दरम्यान विजांचा कडकडाट होत होता. जशी थंड हवा सुटली तसा पाऊस जोरात कोसळू लागला होता.धरणी वरील माती तापलेली असताना पावसाच्या धारा पडल्यानंतर मातीला एक वेगळाच दर्प सुटला होता.पुनः पुनः हवासा वाटणारा सुगधं परिसर दरवळून सोडत होता.गणपत रावांनी खात्री केली होती त्या वळीवाच्या आगमनाची ,जशी वीज चमकत असे, तशी गणपत रावांची कारभारीन राम राम म्हणत असे, सकाळ लख्ख प्रकाश आणि उकाडा तर सायंकाळी असा वळीवाचा पाऊस त्यामुळे हा पाठशिवणीचा खेळ कधी संपतो असे झाले होते.पंधरा दिवस झाले आणि आकाश कायमचे ढगांनी झाकळले. अर्ध्या जेष्टात वरूण राजांनी आपली हजेरी लावली होती.शेतकरी बांधव पेरणी च्या कामाला लागले होते. पावसाच्या बेधुंद सरी कोसळत होत्या त्या सरीकडे पाहून गणपत रावांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते . याच वेळेची वाट पहाण्यात तीन महिने अपार कष्ट केले होते.गणपतराव वरूण राजाकडे पहात, वा रे माझी पाणकळा असे म्हणू लागले होते.




