आरोग्य व शिक्षण

बारामती परिसरात आढळले दुर्मीळ पांढरे गिधाड!!

लेखन- सौ. गायत्री नचिकेत अवधानी (निसर्ग अभ्यासक)

बारामती परिसरात आढळले दुर्मीळ पांढरे गिधाड!!

पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड हे युरोप, आफ्रिका आणि अशिया या काही खंडातील विविध देशांमध्ये आढळतात. अरेबिया, टांझानिया,इजिप्त मोरक्को, ट्युनिशिया या ठिकाणी याची संख्या बऱ्यापैकी आहे. भारतात १९९९ ते २००० च्या काळात गिधाड चांगल्या संख्येने होती. गिधाडांच्या अस्थितवाच्या नोंदी अगदी रामायण मध्ये देखील वाचायला मिळतात. जटायू हे देखील एक गिधाड होते. परंतु काही कारणांमुळे भारतात याच अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आल. भारतात IUCN लिस्ट मधील संकटग्रस्त प्रजाती म्हणून गिधाडांना घोषित करण्यात आल. भारतामध्ये पश्चिम घाटामधील मोयार व्हॅली (रॅप्टर व्हॅली ऑफ वेस्टन घाट) या ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये याची हजेरी असते. हे भारतात राजस्थान व गुजरात येथे स्थलांतर करून येतात. तसेच भारतातील विविध भागांमध्ये हा स्थलांतर करून येतो. मागील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये देखील जानेवारी महिन्यात बारामती परिसरात पांढरे गिधाड दिसून आले होते. याही वर्षी बारामती परिसरात त्यांनी न चुकता हजेरी लावली. अशी माहिती इको रेस्क्यू , दौंड या संस्थेचे अध्यक्ष श्री नचिकेत सुधीर अवधानी यांनी बारामती वनविभागास दिली.
हा पक्षी घारीच्या आकाराचा असून पांढरे गिधाड नावा प्रमाणेच शरीरावरील पिस मळकट पांढऱ्या रंगाची असतात. डोक्यावरील बाजूस पिसे नसतात. चोच पिवळी असते. उडताना याच्या पंखांचा रंग काळा दिसतो. नर व मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात. विशेष म्हणजे यांचा जोडीदार हा आयुष्यभर एकच असतो. हा पक्षी 30 ते 37 वर्ष जगतो. हा पक्षी दरवर्षी हजारो किलोमीटर चा प्रवास करतो आणि थंडीच्या काळात स्थलांतर करून भारतामधील विविध ठिकाणी येऊन पोहोचतो.
बारामती भागात आलेले गिधाड हे मध्यम वयीन असल्याने त्यांना मूळ रंग येणे अजून बाकी आहे. काळपट फिक्कट राखाडी कलर व काळी चोच हा त्यांचा रंग सध्या दिसून येत आहे. अतिशय दुर्मिळ आणि नष्टप्राय होत चाललेला हा पक्षी आपल्या परिसरात दिसत आहे व “स्वच्छता दुत” चे काम अगदी चोख पणे पार पाडत आहे.
मेलेली जनावरे हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. जेथे केरकचरा व घाण साठवलेली असेल अशा ठिकाणी, हे नेहमी भक्ष्य शोधीत असलेले दिसून येतात. एक एक पाऊल टाकीत डुलत डुलत हे चालते. ही गिधाडे सर्व प्रकारची घाण आणि विष्ठा खातात. त्यामुळे काही भागात यांना शेण्यागिधाड म्हणूनही संबोधलं जातं. कधीकधी मेलेल्या जनावराचे कुजणारे मांसदेखील ही खातात. काही वर्षांपूर्वी भारतामध्ये बऱ्यापैकी दिसणारा हा पक्षी diclofenac औषधांच्या अती वापरामुळे भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोचला. हे औषध पाळीव जनावरांना ताप येणे किंवा उत्तेजना अशा आजारांवर देण्यात येत होतं. त्या जनावरांचं मांस खाल्ल्यावर गिधाडांच्या किडनीवर याचा विपरीत परिणाम होऊन किडनी काम करत नसल्याकारणाने मग यांचा मृत्यू होत. २००६ मध्ये या औषधांच्या वापरावर कायद्याने बंदी आणली गेली.
२०२२ मध्ये चालू झालेल्या ” प्रोजेक्ट trydic” या प्रकल्पामुळे हा पक्षी स्थलांतरित होऊन आपल्याही भागात येत आहे हे प्रथम लक्षात आले. या प्रकल्पा मध्ये मेलेल्या जनावरांवर खायला आलेल्या वन्यप्राणी , पक्षी आणि पाळीव प्राणी यांच्या मधील परस्परसंवाद याचा अभ्यास RESQ चॅरिटेबल ट्रस्ट, इको रेस्क्यू दौंड व grassland ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. त्यावेळी मेलेली जनावरे गावा बाहेर कुठे टाकतात त्यांना खाण्यासाठी कोणते प्राणी पक्षी येतात यावर ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे निरिक्षण करण्यात आले. यावेळी बारामती परिसरात हा पक्षी प्रथम जानेवारीत २०२२ मध्ये निदर्शनास आला. त्यानंतर २०२३ मध्ये देखील जानेवारी महिन्यातच बारामती परिसरात मेलेल्या मोठ्या जनावराच मांस खाताना दिसून आला.
बारामती भौगीलक दृष्ट्या चारही बाजूने मोकळ्या माळरानाने तसेच शेतीने वेढलेला आहे. येथे शेतकरी असल्याने पोल्ट्री आणि दुग्धव्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी लोकांची मेलेली जनावरे, पोल्ट्री मधील मेलेल्या कोंबड्या वन क्षेत्राच्या जवळील गायरान भागात किंवा वन क्षेत्रात उघड्यावर टाकली जातात. अशावेळी त्यावर कोल्हे, खोकड, लांडगे, तरस, बिबट, रानडुकरे, उदमांजरे असे विविध जंगली प्राणी “स्वच्छता दूत” बनून येतात. खूप कमी शिल्लक असेल्या जागेत आपले अस्थित्व टिकून असलेले हे सर्व प्राणी पक्षी निश्चितच आपल्या फायद्याचे आहेत. या प्राण्यांचा अस्तित्व आहे म्हणूनच आपल्या निसर्ग स्वच्छ आणि समृद्ध आहे. त्यासोबत आपली जैवविविधता आणि अन्नसाखळी टिकवण्यामध्ये यांचा खूप मोठा हातभार आहे.
ह्याच गोष्टीची जाण म्हणून तरी आपण माळराने जगवली पाहिजेत. त्यातील जैवविविधता जगविणे ही आपलीच जबाबदारी आहे. मेलेल्या जनावरांपासून होणारा हवा प्रदूषण आणि पसरणारी रोगराई आपण या स्वच्छता दूतांपासून नियंत्रणात ठेवू शकतो. त्यांना वाचविण्यातच आपले हित आहे.

लेखन- सौ. गायत्री नचिकेत अवधानी
(निसर्ग अभ्यासक)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.