जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,मांदळेवाडी येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली लघु उद्योग व बँक व्यवहाराची माहिती!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये इयत्ता ६ वी पासून विद्यार्थ्यांना कौशल्या वर आधारित शिक्षण देणे, परिसरातील विविध व्यवसाय यांना भेटी देऊन २२ व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे या हेतूने वडगावपीर,मांदळेवाडी शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोणी ( ता.आंबेगाव ) येथे प्रगती डाळ मिल या लघु उद्योगास भेट दिली.यावेळी प्रगती डाळ मिलच्या संचालिका ज्योती गोरडे यांनी या व्यवसायाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तसेच प्रा.अरुण गोरडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून भविष्यातील आव्हाने पेलविणारे सुजान नागरिक आणि उद्योजक बनण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तदनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोणी येथे भेट देण्यात आली.त्याठिकाणी बँकेचे व्यवस्थापक निर्मला चव्हाण यांनी बँकेत व्यवहार कसे चालतात कोणत्या सुविधा नागरिकांना मिळतात याची माहिती सांगून बँकेतील विविध फॉर्म विद्यार्थ्यांना हाताळण्यास दिले.नंतर भैरवनाथ विद्यालय लोणी येथील प्रयोग शाळेस भेट देऊन त्या ठिकाणी विज्ञान शिक्षक प्रयोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेतील साहित्याची माहिती देऊन साहित्य हाताळण्यास दिले.आणि छोटे छोटे प्रयोग दिग्दर्शन करून विद्यार्थ्यां मध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत केली.
सदर क्षेत्र भेट घडवून आणणे कामी वडगावपीर शाळेचे मुख्याध्यापक भगवंत टाव्हरे आणि मांदळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ यांनी नियोजन केले होते.

लोणी (ता.आंबेगाव ) येथे डाळमिलला मांदळेवाडी व वडगावपीर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली.