समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा !!


प्राचीन आरोग्य परंपरेचा आधुनिक जीवनशैलीत संगम
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेल्हे येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने नुकताच साजरा करण्यात आला.
आयुर्वेदाच्या क्षमतेवर व विविध उपचार पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे आणि आयुर्वेद शास्त्राचा जगभर प्रसार करणे हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.हा दिवस विविध आजारावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक तत्त्वांचा समावेश व्हावा यासाठी समर्पित आहे.आयुर्वेदिक उपचार पद्धती ही काळाची गरज असून या दिवसाच्या निमित्ताने या उपचार पद्धतीस प्रोत्साहन दिले जाते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरि पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते औषधी वनस्पतींच्या रोपांचे प्रतीकात्मक पूजन करून “निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश” देण्यात आला.
डॉ.रमेश पाडेकर यांनी “आयुर्वेद :आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,“आयुर्वेद ही फक्त औषधोपचाराची पद्धत नाही,तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे.आहार,दिनचर्या,ऋतुचर्या व औषधी वनस्पतींचा योग्य वापर केल्यास अनेक आजार टाळता येतात. आयुर्वेद म्हणजे संतुलित,निरोगी व दीर्घायुषी जीवनाचा शास्त्रशुद्ध मार्ग आहे.”
समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर आपल्या मनोगतात म्हणाले की,समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला.या उपक्रमातून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होते. निसर्गाधारित जीवनशैलीतूनच निरोगी भारताची निर्मिती होऊ शकते.सर्वांनी या प्राचीन शास्त्राचा अंगीकार करून आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीत योगदान द्यावे.”
या कार्यक्रमासाठी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे प्राचार्य डॉ. रमेश पाडेकर,डॉ.राजेंद्र निचित,डॉ.जयश्री चव्हाण,डॉ.शुभांगी कोकाटे,डॉ.जागृती ताजणे,डॉ.दत्तात्रय केदार,डॉ.अब्दुल शेख,डॉ.मृणाल वनवे,यशवंत फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.