आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात टोमॅटो बांधणीला आलाय वेग !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगावच्या तालुक्यांतील पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, पोंदेवाडी, लाखणगाव, पारगाव,शिंगवे परिसरात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोची बांधणी करण्यात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मजूर टंचाईमुळे सावड पद्धतीने ही कामे करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.
उन्हाळी हंगामात 1 मे तसेच पावसाळी हंगामात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. या दरम्यान लागवड झालेल्या टोमॅटोला हमखास बाजारभाव मिळत असतो, असा बऱ्याच वर्षांचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
कारण यादरम्यान वळवाचा किंवा अवकाळी पाऊस होत असतो. चालू वर्षी अवकाळी पावसाने अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.खतांची योग्य मात्रा, वेळेवर योग्य औषध फवारणी करत आपल्या बागा शेतकरी वाचवतात व हमखास बाजारभाव मिळतो.
पूर्व आंबेगावात टोमॅटोच्या बांधणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र, मजुरांची टंचाई भासत आहे. टोमॅटो बांधणीसाठी जास्त रोजंदारी द्यावी लागत असल्याने यावर स्थानिक शेतकऱ्यांनी सावड पद्धतीने टोमॅटोची बांधणीचा पर्याय निवडला असल्याचे धामणी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी शांताराम रोडे यांनी सांगितले.
टोमॅटोवर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या फडात कामगंध सापळे अथवा पिवळे चिकट सापळे लावावेत.
त्यावर चिकटलेल्या माशा पाच सहा दिवसांनी काढून त्यावर ग्रिस अथवा एरंड तेल लावल्यास फळमाशी आटोक्यात येऊ शकते असे अनुभवी टोमॅटो उत्पादक सांगत आहे.
टोमॅटोच्या बाजारभावात चढ उतार होत असला तरी टोमॅटो पिकासाठी अनुकूल हवामान मात्र नाही. करपा, भूरी आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. टॉमेटो झाडांची वाढदेखील होत नाही तसेच टॉमेटो फळांची फुगवण होत नाही. यासाठी महागडी औषधे आणून फवारणी करावी लागत आहेत. उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ झाली असल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी खंडू लबडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.