जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील कापडदरा हद्दीत सोडली जात आहेत लहान मोकाट वासरे !!


आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावातील कापडदरा व गणेश नगर या परिसरात वनविभागाच्या हद्दीत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक क्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत. खायला पुरेसे अन्न न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत. तसेच या परिसरात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरांमध्ये मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात आहेत. ही वासरे आणि कोंबड्या मेल्यानंतर त्यांचा दुर्गंध वास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराला नक्की जबाबदार कोण व स्थानिकांच्या आरोग्याशी कोण खेळते आहे ? सवाल स्थानिकांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केला.
मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत.मात्र शिल्लक राहिलेले वासरू कुत्र्यांनी न खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावरती होतो आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खायला काहीही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या वासरांवरती, शेळ्यांवरती हल्ला चढवत आहेत. आधीच या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे. त्यात आलेले हे नवीन संकट यामुळे या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी मेटाकुटिला आलेले आहेत.

याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल कापडी व स्थानिक रहिवासी यांनी पंचनामाशी बोलताना केली.