लोक सहभागातूनच ग्रामस्थ,नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध- तहसीलदार डॉ.सुनील शेळके
राजुरी मध्ये "जिवंत सातबारा मोहिमे" ला उदंड प्रतिसाद!!

राजुरी मध्ये “जिवंत सातबारा मोहिमे” ला उदंड प्रतिसाद!!
लोक सहभागातूनच ग्रामस्थ,नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध- तहसीलदार डॉ.सुनील शेळके
महाराष्ट्र शासन महसूल विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तसेच तहसील कार्यालय जुन्नर व ग्रामपंचायत राजुरी आणि समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जिवंत सातबारा मोहीम” राजुरी येथे यशस्वीपणे राबविण्यात आली.
महसूल विभाग १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांचेकडील निर्देशानुसार सर्व खातेदारांच्या वारसाच्या नोंद अधिकार अभिलेखा मध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राजुरी गावांमध्ये सदरची मोहीम राबवण्यात येत आहे.त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी), नवीन मतदार नाव नोंदणी, रेशनिंग कार्ड वरील नावे कमी करणे व वाढविणे यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्याचे तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी राजुरी गावचे ग्रामनेते व माजी सभापती दिपकशेठ औटी,राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माऊली शेठ शेळके,युवा नेतृत्व वल्लभ शेळके,शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एमडी घंगाळे साहेब,डी बी गटकळ,मोहनशेठ नाईकवाडी,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश औटी,उपाध्यक्ष दिलीप घंगाळे,संदिप औटी,अशोक शेठ औटी,ग्रामपंचायत सदस्य शाकिर भाई चौगुले,रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,गौरव घंगाळे,बेल्हे परिमंडळाचे सर्कल मडके भाऊसाहेब,तसेच तलाठी धनाजी भोसले,कोतवाल सचिन औटी,तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थ नागरिक व शेतकरी यांना मार्गदर्शन करताना तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके म्हणाले की, महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने जिवंत सातबारा मोहीम आपल्या राजुरी गावामध्ये राबविण्यात येत आहे त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन याबाबतची माहिती वाडी-वस्त्यावर जाऊन त्याचप्रमाणे प्रत्येक मळ्यामध्ये जाऊन लोकां पर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचप्रमाणे इ रेशन कार्ड असेल ईपीक पाहणे असेल यासारखे अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रम लोक सहकार्याने उत्तम रित्या पार पडलेले आहेत.जिवंत सातबारा म्हणजे सातबाऱ्यावरील मयत व्यक्तींची नावे कमी करणे आणि वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करून घेणे.
लोक सहभागातूनच ग्रामस्थ,नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी तहसीलदार डॉ.सुनील शेळके म्हणाले. लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,कोतवाल, तंटामुक्ती कार्यकारीणी यांच्या सहकार्याने गावातील प्रश्न गावातच सोडवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत अशी ग्वाही यावेळी तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी दिली.
“जिवंत सातबारा मोहिमे” अंतर्गत ६० कुटुंबांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदीचे अर्ज भरून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले.४० शेतकऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शेतकरी ओळखपत्र काढण्यात आले.५० नवीन मतदारांची नोंदणी अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.१२५ कुटुंबांचे रेशनकार्ड मध्ये नाव कमी व वाढवणे याबाबतचे नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले.
सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांनी मानले.