थोरांदळे(ता.आंबेगाव) येथे हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश!!

थोरांदळे(ता.आंबेगाव) येथे हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश!!
प्रतिनिधी – समीर गोरडे
मौजे थोरदांळे येथील फुटाणेमळा या ठिकाणी वनविभागांने लावलेल्या पिंजऱ्यात साधारण पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा बिबट्या राञीच्या बाराच्या सुमारास जेरबंद झाला.दोन दिवसांपूर्वी या परिसरात एका कामगारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना या परीसरात घडली होती.
या घटनेची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर श्री.विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने ताबडतोब घटनास्थळी पिंजरा लावला होता.आज मध्यरात्री नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी वनमजूर महेश टेमगिरे यांना दिली.वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनेची माहिती वनपाल प्रदिप कासारे यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी ताबडतोब वनपाल प्रदिप कासारे,ऋषिकेश कोकणे,बिबट कृतीदल गावडेवाडी मनोज तळेकर,चारूदत्त बांबळे,कुणाल गावडे,हर्षल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पहाटे अडीचच्या सुमारास ताब्यात घेतले.सदर घटनास्थळी थोरदांळे गावचे उपसरपंच संदिप टेमगिरे तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून वनविभागाला मदत केली. वनविभागांने हल्ला करणारा बिबट्याला जेरबंद केल्याने वनविभागाचे आभार मानले.