व्रतस्थ सेवेचा सुवर्णकाळ!!
शब्दांकन-श्री.लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंज माजी प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय मंचर

व्रतस्थ सेवेचा सुवर्णकाळ!!
१३ डिसेंबर १९७३ रोजी राजगुरुनगर येथे सेवा क्लिनिकचा शुभारंभ आदरणीय डॉ. अनिलजी खिंवसरा यांनी बाजारपेठ येथे त्या काळाला अनुसरून संपन्न झाला. मागे वळून पाहताना सुमारे पन्नास वर्षापूर्वीचा कालखंड लगेच डोळ्यासमोर येतो.
त्यावेळची परिस्थिती अर्थात सामाजिक स्थिती,दळणवळण साधने,लोकांच्या गरजा,आर्थिक स्थिती आणि एकूण जनजीवन डोळ्यासमोर आणल्यास कल्पना करा की काय अपेक्षा असत. त्या परिस्थितीत डॉ. अनिलजी खिंवसरा यांनी तालुका पातळीवर आपली वैद्यकसेवा सुरू केली आणि आजतागायत ती अव्याहतपणे सुरू आहे.गेले पन्नास वर्षे एकेच ठिकाणी हा वैद्यक सेवेचा प्रवास अखंडपणे सुरू ठेवणे हि एक साधना आहे. कारण सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक स्थित्यंतर घडूनही व्रतस्थपणे केवळ सेवाभावी वृत्तीने हा सेवायज्ञ चालू ठेवणे तसेच मानवताधर्म जागृत ठेऊन प्रसन्नतेने रुग्णसेवेत आनंद मानून एक आनंदयात्री म्हणून सरांचा प्रवास सुरू आहे.
सदैव हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून सरांचा राजगुरुनगर शहर तसेच घोडेगाव, मंचर,नारायणगाव अर्थात उत्तर पुणे जिल्ह्यात लौकिक आहे. मूळचे घोडेगाव तालुका आंबेगाव येथे वास्तव्यास असणारे खिंवसरा कुटुंबीय अतिशय प्रेमळ,सोज्वळ आणि लोकाभिमुख असणारे नंतर राजगुरुनगर येथे वास्तव्यास आले; आज मुळा- मुठेच्या तीरावर वसलेल्या विद्येच्या माहेरघरी म्हणजे पुणे येथे स्थिरस्थावर झाले असले तरी राजगुरुनगर येथे आजही रुग्णसेवेसाठी सातत्यपूर्ण येत आहेत.
राजगुरुनगरवासियांचे प्रेम त्यांनी रुग्णसेवा तसेच शैक्षणिक सेवेतून प्राप्त केले आहे. याची परिणती म्हणून राजगुरुनगर सहकारी बँकेवर सतत पंचवीस वर्षे संचालक म्हणून प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिले; चेअरमन म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कामकाज करत सभासदांच्या कौतुकास पात्र ठरले. रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाच्या सामान्य स्तरापर्यंत केवळ परिचय नव्हे तर अजूनही ऋणानुबंध जुळले आहेत.
फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांचे जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे अनेक कुटुंबाशी संबंध आहेत ; तो ओलावा आणि प्रेमाचे नाते आजही टिकून आहे. अनेक कुटुंबातील तिसऱ्या पिढीपर्यंत असणारे रेशमी बंध अजूनही अगदी लिलया जोपासले आहेत. अलीकडच्या काळात दुरापास्त ठरणाऱ्या या बाबी डॉक्टरांनी सहजतेने सांभाळल्या आहेत. वाकळ वाडी सारख्या भौगोलिकदृष्ट्या आड वळणाचे गाव परंतु अनेक कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर म्हणून आजही तेवढ्याच श्रध्देने आणि प्रेमाणे संपर्क साधतात. आंशी – नव्वदीच्या वयातील रुग्ण तेवढ्याच श्रध्देने आणि विश्वासाने डॉक्टरांकडे येतात.
त्याचबरोबर खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालक म्हणून अनेक शैक्षणिक उपक्रमात सहभागी व मार्गदर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी केल्याचे सर्वश्रुत आहे. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी राजगुरुनगर चे सेक्रेटरी म्हणून कामकाज करत प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून ठसा उमटविला तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरूनगर या संस्थेवर संचालक म्हणून गेले चाळीस वर्षे कार्यरत आहेत.शिक्षण, सहकार,वैद्यक आणि सांस्कृतिक अशा चतुरस्र कार्यामुळे समाजमनात त्यांचेविषयी आदराची आणि प्रेमाची सद्भावना अगदी प्रत्येकाच्या मनात आहे. जनमानसात एक शांत,संयमी आणि सोज्वळ प्रतिमा असणारे डॉक्टर यांच्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी यांना मौलिक असे मार्गदर्शन व मदत तसेच नवनवीन उपक्रम शालेय स्तरावर त्यांच्या कल्पनेतून साकार झाले आहेत. मौखिक माध्यमातून अनेक रुग्ण त्यांच्याविषयी i
कृतज्ञताभाव व्यक्त करतात.
लिंबगाव दावडी येथील एक गृहस्थ सांगत होते पायाने चालता येत नव्हते परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने आज धडधाकट चालता येते. हा बोलका अनुभव क्लिनिक मध्ये ऐकला. असो एक ना अनेक रुग्णांचे बोलके अनुभव हे डॉ. अनिलजी खिंवसरा यांची ऊर्जा आहे.
आजही पंच्याहत्तरित तरुणांना लाजवेल अशी त्यांची हालचाल आणि पायी चालण्याची सवय लाजवाब आहे.
कौटुंबिक जबाबदारी व मुलांच्या शैक्षणिक बाबींसाठी डॉक्टर पुणे येथून येऊन – जाऊन करू लागले त्यातही प्रवासी मित्रांचा ग्रुप त्यांच्या बोलक्या व हसतमुख स्वभावाने अल्पावधीत तयार झाला. आजही त्यांचे चाहते प्रवासी तसेच एस. टी. बसचे चालक – वाहक यांचे स्नेहाचे आणि प्रेमाचे नाते आहे. असे बहुआयामी आणि सर्वांना आपला माणूस म्हणून जिव्हाळ्याचे संबंध असणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. अनिलजी खिंवसरा यांचा परिचय आहे.डॉ. अनिलजी खिंवसरा यांच्या एकूण वाटचालीत आणि कौटुंबिक उत्कर्ष यामध्ये पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ. छायाताई यांनी दुसरी बाजू समर्थपणे सांभाळली त्यात मुला – मुलीचे संगोपन आणि आल्या – गेल्याचे आतिथ्य यात त्यांचे मौलिक योगदान आहे.भाग्याची गोष्ट म्हणजे त्यांची पाचवी पिढी आज सरांच्या समवेत गोड संवाद साधते आहे; मी दूरध्वनीवर बोलताना हळूच सरांची नात त्यांचेबरोबर गुजगोष्टी करत असते.एक कृतज्ञता सोहळा म्हणून त्यांचे चिरंजीव अक्षय खिंवसरा आणि कन्या सौ.अर्पिता खिंवसरा – जैन यांचे कल्पनेतून डॉ. अनिलजी खिंवसरा यांच्या सेवा क्लिनिक चा सुवर्ण महोत्सव आणि डॉ. अनिलजी खिंवसरा यांच्या पंच्याहत्तरी निमित्त अमृत महोत्सव सोहळा असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे त्या निमित्ताने सरांना खूप खुप शुभेच्छा! त्यांची हि अमृतमयी वाटचाल अशीच शतकपूर्तिकडे धाव घेत राहो ! हि प्रभु चरणी विनम्र प्रार्थना!
शब्दांकन – श्री.लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंज माजी प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय मंचर