उद्योजकांनी शैक्षणिक संस्थांना मदत केल्यास विद्यार्थ्यांचा विकास होईल-ॲड.प्रदीप वळसे पाटील

उद्योजकांनी शैक्षणिक संस्थांना मदत केल्यास विद्यार्थ्यांचा विकास होईल-ॲड.प्रदीप वळसे पाटील
उद्योजक क्षेत्र व विविध शैक्षणिक संस्था यांनी एकत्र मिळून काम केले तर औद्योगिक क्षेत्राच्या विकासा बरोबरच शालेय संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील विकास होईल तसेच विद्यार्थ्याच्या विकासासाठी कौशल्य विकास हे व्यवसाहिक शिक्षण संस्थांनी सुरू केले पाहिजेत असे मत निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयासाठी केल्विन इंडिया कंपनी प्रा.लि.चाकण या कंपनीने शालेय इमारतीसाठी बारा लाख रुपयांची मदत दिल्याने या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मानाचा कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला यावेळी ॲड.प्रदीप वळसे पाटील बोलत होते.
यावेळी केल्विन इंडिया कंपनी प्रा.लि.चे वरिष्ठ व्हाईस चेअरमन श्रीपाद खरे यांनी विद्यालयातील गुणवत्ता व विविध उपक्रमांचे कौतूक करून भविष्यात
विद्यालयास मदत केली जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी केल्विन इंडिया कंपनीचे सिनियर मॅनेजर योगेश गाजरे पाटील,संस्थेचे उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील, सचिव प्रकाश तापकीर, संचालक प्राचार्य सुनिल वळसे पाटील,माजी प्राचार्या सुनंदा गोरे, दिलीप लोखंडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी केले, सुत्रसंचालन मोहन दरेकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी मानले.
या कार्यक्रमानिमित्त एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या ३२ विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या व इयत्ता दहावीमध्ये तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या दहामध्ये येणार्या
विद्यार्थ्यांना हवाई सफरने (विमान प्रवास ) हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे असे सांगितले.