जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथील चिमुकली रंगून गेली बाल दिंडी सोहळ्यात !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी- आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांचा बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई,संत जनाबाई, विठ्ठल रखुमाई आधी संतांच्या वेशभूषा केल्या होत्या.ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात संपूर्ण जारकरवाडी चा परिसर भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला होता.

या पायी दिंडी सोहळ्यात गोल रिंगण,उभे रिंगण देखील संपन्न झाले. या पायी दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या बरोबरच त्यांचे पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
महिला भगिनींनी या पायी दिंडी सोहळ्यात फेर धरत फुगड्या खेळण्याचा देखील आनंद लुटला.हिंदू धर्माचे प्रतीक असणाऱ्या भगव्या पताका खांद्यावरती घेऊन विद्यार्थी वारीत सहभागी झाले होते तर नऊवारी साडी नेसून सौभाग्याचं लेणं समजले जाणारे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या सर्व बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.खऱ्या अर्थाने प्रगत समाज व प्रगत पिढी तयार करायची असेल तर विज्ञानाला अध्यात्माची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे. कारण अध्यात्मामध्ये सांगितलेले सर्व संस्कार हे हल्लीच्या तरुण पिढीसाठी निश्चितच अनुकरणीय आहेत. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.लहान वयात त्याच्या मनावर जे संस्कार बिंबवले जातात ते संस्कार त्याला त्याच्या पुढील आयुष्यामध्ये एक चांगला माणूस बनण्यासाठी पोषक ठरतात. ही संस्कार रुजवण्याचे एक उत्तम साधन म्हणजे अध्यात्म आहे. म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे सर यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

या संपूर्ण वारीचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी चे सर्व शिक्षक वृंद यांनी केले. या उपक्रमाचे जारकरवाडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांनी कौतुक केले आहे.
