एस.टी.च्या ढिसाळ नियोजनाचा प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फटका!!

एस.टी.च्या ढिसाळ नियोजनाचा प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फटका!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एस.टी. च्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत असून बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे.या संदर्भात पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायतींनी वारंवार राजगुरूनगर आगार, मंचर आगार यांना निवेदन देऊन तक्रार केली परंतु त्यावर कुठलीच उपाययोजना होत नसून प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत.
ग्रामीण भागातील अनेक लोक आजही एस.टी. च्या प्रवासावर अवलंबून आहेत. परंतु वेळेवर गाडी येत नसल्याने शिरदाळे,धामणी,पहाडदरा, लोणी,मांदळेवाडी परिसरातील प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत धामणीच्या सरपंच सौ.रेश्मा बोऱ्हाडे,शिरदाळे सरपंच सौ.सुप्रिया तांबे यांनी बऱ्याचदा पाठपुरावा देखील केला आहे परंतु यात सुधारणा होत नाही.
आमचे विद्यार्थी रोज एस.टी. ची वाट पाहत असतात पण वेळेवरती कोणतीच गाडी येत नाही.एक दिवस आली तर दोन दिवस येत नाही,आली तरी मधेच बंद पडते त्यामळे आमच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत असे शालेय विद्यार्थ्यांचे पालक श्री.देविदास(पप्पू)रणपिसे यांनी सांगितले.तर काही एस.टी. जर खेड वरून वाफगाव गुळानी मार्गे आल्या तर जाताना पाबळ मार्गे जात आहेत त्यामुळे त्याचा देखील त्रास जास्त प्रमाणावर असल्याचे प्रवासी बाळासाहेब कारभारी तांबे,तान्हाजी महाराज तांबे यांनी सांगितले.
हवे तर एस.टी. मोजक्या सोडा पण त्या वेळेवरती सोडा त्यामुळे प्रवाशांना त्यावर अवलंबून राहता येईल तसेच जेष्ठ प्रवासीसंख्या जास्त असेल तर वाहक आणि चालक त्यांच्याशी देखील चांगले वागत नाहीत. शिवाय त्यांना जर फ्री प्रवास असेल तर त्यांच्याशी बोलण्याची भाषा देखील सरळ नसते अशी देखील काही प्रवासी तक्रार करत असतात. त्यामुळे हे सर्व सुरळीत होण्याची गरज आहे.
आज जरी एस.टी. ने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी ग्रामीण भागात अनेक लोक एसटी च्या प्रवासावर अवलंबून असतात. त्यामुळे महामंडळाने कमीत कमी वेळेवरती जर गाड्या सोडल्या तर त्याचा त्रास प्रवासी आणि विद्यार्थी यांना होणार नाही. त्यात एसटी ने भाडेवाढ केली आहे मग आपण सुविधा तरी योग्य द्या.त्यात जेष्ठ प्रवासी असतील त्यांच्याशी आदराने व्यवहार करा. ते फुकट जरी प्रवास करत असले तरी त्यांना शासनाने दिलेली ती सुविधा आहे.
श्री.मयुर संभाजी सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)