क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीसामाजिक

तमाशातील वगनाट्याला जिवंतपणा देणारा सोनेरी हातांचा जादूगार पेंटर नंदकुमार!!

साभार लेख - बाबाजी कोरडे (लोककलावंत अभ्यासक) राजगुरूनगर, पुणे.

तमाशातील वगनाट्याला जिवंतपणा देणारा सोनेरी हातांचा जादूगार पेंटर नंदकुमार!!

नकळत्या वयापासून आजपर्यंत जवळजवळ अर्धशतकभर अनेक लोकनाट्य तमाशे मी पाहात आलोय.
कार्यक्रम कोणताही असो,मात्र सर्वांमध्ये एक गोष्ट नेहमी सारखीच दिसायची आणि ती म्हणजे रंगमंचावरील मोठ्या खुबीनं लावलेले पडदे आणि त्या पडद्यावर खाली उजव्या कोपऱ्यात विशिष्ट शैलीत लिहीलेले नांव….
पेंटर नंदकुमार!!

वगनाट्यांचा तो काळ म्हणजे लोकनाट्य तमाशाचे सुवर्णयुग होते. अनेक दिग्गज कलावंत घडले गेले ते याच काळात!!

वगनाट्यामध्ये जीवंतपणा आणण्यात सर्वात जास्त मोलाचे योगदान जर कशाचे असेल, तर त्या प्रसंगानूरूप लावलेल्या पडद्यांचेच !!

आम्हा मित्रांचा घोळका तर रंगमंच ऊभा करताना जातीनं तिथंच हजर राहात असू!!

कारण पडदे किती व कोणते लागणार आहेत, त्यावरून त्या दिवशी कोणते वगनाट्य सादर होणार आहे हा अंदाज घेण्यात आमची त्या बालवयात राष्ट्रीय पातळीवर चर्चा व वादविवाद होत असत!!

सर्वात पुढील पडदा म्हणजे निमशहरी गावातील चौक दिसत असे.काटकोनातील आखिवरेखीव सुखवस्तू बैठ्या इमारती व त्यांचे दरवाजे, खिडक्या आणि रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे खांब तसेच मधोमध सरळ मागे जाणारा रस्ता बरोब्बर ग्रामदैवताच्या मंदिराकडे जाताना पाहताना रसिकांचे देहभान हरपत असे !!

रजवाडी व ऐतिहासिक वगनाट्यातील राजदरबारी पडदा पाहून आपण प्रत्यक्ष दरबारात हजर आहोत हा आभास रसिकांना मोहवून टाकणारा असे!!

सामाजिक वगनाट्यातील हुबेहूब घनदाट जंगलाचा वास्तव अनूभव या पडद्यांवरूनच आम्हाला मिळाला…
‘डाव त्या बाईच्या रक्ताचा !’
ह्या सुरेश काळे लिखीत वगनाट्यामध्ये वापरलेला जंगलाचा पडदा आजही आठवताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाही !
झाडावरील प्रेताचे टपकणारे रक्त व त्याचा ‘टप-टप’ असा भेसूर आवाज…आणि त्याचवेळी त्या झाडाच्या डोलीतून बाहेर येणाऱ्या हिंस्त्र हातांची!!

ज्यावेळी जंगलवाटेच्या वाटसरूच्या गळ्याभोवती मगरमिठी पडत असे. त्यावेळी पडद्याबरोबर समोरच्या प्रेक्षकांचे अंगदेखील शहारल्याशिवाय राहात नसे….

उत्तम रंगसंगती, चित्राचे सौष्ठव आणि त्याचा प्रसंगानूरूप केलेला वापर यामुळे ते वगनाट्य अशा उंचीवर पोहोचत असे की त्याची चर्चा पुढील वर्षीच्या यात्रेपर्यंत चालत असे….

स्व.नंदकुमार खोल्लम खऱ्या अर्थाने अजरामर ठरले ते यामुळेच, असे म्हणताना अतिशयोक्ती अजीबातही वाटत नाही…
जनमाणसांमध्ये त्या पडद्यांचेच आकर्षण आजदेखील आहे,पण नवनवीन वगनाट्ये असायला हवीत ना !!!

✍️बाबाजी कोरडे (लोककलावंत अभ्यासक)
राजगुरूनगर, पुणे.
9730730146

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.