आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता. आंबेगाव) च्या खंडोबाच्या सप्तलिंगाची व बैलाच्या शिल्पाची आख्यायीका !!!

धामणी(ता. आंबेगाव) च्या खंडोबाच्या सप्तलिंगाची व बैलाच्या शिल्पाची आख्यायीका !!!

धामणी(ता.आंबेगाव)येथील खंडोबा मंदिर आत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काळ्या पाषाणाची दगडाची खाण व निवडुंगाचे घनदाट बेट व जंगल होते.देवाचे तत्कालीन परंपरागत सेवेकरी भगत मंडळीच्या प्रेमाखातर सागदर्‍यातून देव धामणलिंग गडाच्या कुनाडीवर (वरचा खंडोबा)स्थानापन्न झाले. परंतु काही कालावधीनंतर देवाच्या दैनदिन पुजेसाठी तत्कालीन भगत मंडळीना वृध्दापकाळामुळे वरच्या कुनाडीच्या डोंगरावर दररोज जाणे शक्य होईनासे झाले. त्यावेळी त्यावेळच्या भगताने खंडोबापुढे आपली व्यथा मांडली.देवाने भगत मंडळीना दृष्टांत दिला.भक्तांच्या प्रेमाखातर कुनाडीच्या पायथ्याशी असणार्‍या निवडुंगाच्या बेटात मी माघ पौणिमेच्या (माही पुनव)दिवशी भल्या पहाटे येईल, त्यानंतर भगत मंडळी माघ पौणिमेच्या दिवशी भल्या पहाटे या निवडुंगाच्या बेटाजवळ आले त्यांना येथील निवडुंगाच्या बेटात वाघ बसलेला आढळला.भगत मंडळीची आणि वाघाची नजरानजर झाल्यानंतर वाघ अंतर्धान पावला.वाघ बसलेल्या या बेटात माघ पौणिंमेच्या दिवशी स्वयंभू सप्तशिवलिंग आढळुन आली. यावेळी गाई सप्तशिवलिंगावर दुग्धाभिषेक करत असताना व आजूबाजूला बैल,घोडे,कुत्रा,हत्ती हे प्राणी आनंदोत्सव साजरा करत होते असे पुरातन ग्रंथात असल्याचे सांगण्यात येते.

खंडोबा मंदिर परिसरात सिंह,वाघ,गाय-वासरु,हत्ती,कुत्रा व बैलाची संगमरवरी शिल्पाची प्रतिष्ठापना करण्याची सूचना केंद्रे महाराज संस्थानचे संस्थापक ह.भ.प. कै.गोविंदमहाराज केंद्रे आळंदीकर यांनी धामणी ग्रामस्थांना पंधरा वर्षापूर्वी खंडोबा मंदिराच्या सभामंडपावरील शिखरावर कलशारोहण करताना केलेली होती.

त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात मंदिर परिसरात चार हत्ती,चार घोडे,चार सिंह,गायवासरु,वाघ,कुत्रा,हेगडेप्रधान,चार जयविजय अशा एकुन वीस संगमरवरी शिल्पाची गावडेवाडी ,रहाटणी व धामणी येथील भाविकांनी ही शिल्पे देवस्थानाला अर्पण केलेली आहे.दोन संगमरवरी बैलाची आकर्षक शिल्पे धामणीचे श्री. प्रा.अशोकलाल पगारीया व श्री.ज्ञानेश्वरमाऊली विधाटे यांच्या कुटुंबियानी राजस्थान येथून आणलेली असल्याचे सांगण्यात आले.सप्तशिवलिंगे म्हणजेच खंडोबाचा परिवार समजला जातो.या परिवारात सप्तशिवलिंगे म्हणजेच म्हाळसाई,बाणाई,हेगडे प्रधान, जोगेश्वरी,काळभैरवनाथ,घोडा व कुत्रा असे मानले जाते. या स्वयंभू सप्तशिवलिंगावर माघ पौणिमेच्या दिवशी पहाटे अभिषेक करुन साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवट्याची प्रतिष्ठापना भगत मंडळी करतात.

हेपुरातन मंदिर साध्या दगडानी उभारलेले होते. त्याची मांडणी यवनी पध्दतीची व संपुर्ण मंदिराला चुन्याचा पांढरा रंग होता असे जुने जाणकार सांगतात.

त्यानंतर साधारण १९३२ च्या सुमारास धामणीचे तत्कालीन मुलकी पाटील कै. भगवंतराव आनंदराव पाटील यांच्या पुढाकारातून पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हे भव्य शिखराचे श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिर बांधण्यात आले असल्याचे खंडोबाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत यांनी यावेळी सांगितले.

श्री कुलस्वामी खंडोबा हे जेजूरीहून बाणाईच्या चंदनापुरीला जाताना या कुनाडीच्या परिसरात भगताच्या प्रेमाखातर धामणी येथे मुक्काम केला असल्याची नोंद पुरातन मल्हारी मार्तड ग्रंथात असल्याचे खंडोबाचे व संत साहित्याचे अभ्यासक चक्रनारायण भावे यांनी सांगितले.

दूरचित्रवाणीवरील मल्हारी मार्तंड या धार्मिक मालिकेत खंडोबा धामणी येथे येऊन गेलेले आहेत यांचा उल्लेख झाला असल्याचे श्री.भावे यांनी यावेळी सांगितले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.