आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी परिसरात गेली दोन दिवस झाले सायंकाळी साडेपाच,सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.या पावसामुळे शेतकर्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.या जोरदार पावसामुळे मांदळेवाडी परिसरात अनेक ठिकाणी शेतातील तालींना तळ्याचे स्वरूप आले होते.तर रस्त्याच्या कडेचे चर पाण्याने वाहात होते.तर अनेक ठिकाणाचे सिमेंट बंधारे पाण्याने तुडूंब भरलेले दिसत होते.
जोरदार वादळ वारा व पाऊस एकच वेळी आल्याने शेतातील काम करणारे शेतकरी व वाहनचालकांची चांगलीच तारबंळ उडाली.हा परिसर दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो.तेव्हा या परिसरात पावसाची नितांत गरज होती.असाच पाऊस पडत राहिला तर विहीरी, विंधनविहीरीच्या पाणी पातळीत वाढ होईल असे शेतकर्यांनी सांगितले.या परिसरात चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाने अशीच हजेरी लावली तर पेरणीपूर्व मशागतीला वेग येईल असे मांदळेवाडीचे शेतकरी अप्पा मांदळे व लोणीचे शेतकरी बाळू आढाव यांनी सांगितले.

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे सिमेंट बंधार्यात साचलेले पाणी.