आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त काही मिळेना!! तालुक्यातील दोन महत्त्वाची गावे जोडणारा रस्ता हरवलाय खड्ड्यात!!

या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त काही मिळेना!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असलेल्या पारगाव ( शिंगवे) या दोन गावांना जोडणारा रस्ता खड्ड्यांच्या गर्दीत हरवून गेला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नाही की काय? असा उद्विग्न सवाल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांनी, स्थानिक रहिवाशांनी, विद्यार्थी वर्गांनी केला आहे.

जारकरवाडी वैदवाडी मार्गे पारगाव या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सोबतीला आजूबाजूला असणारी झाडे-झुडपे देखील वाढली आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना खड्डा चुकवण्याचे मोठे ध्येय प्रवाशांना करावे लागत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पारगाव (शिंगवे)ओळखले जाते. या परिसरात विविध शैक्षणिक संकुले,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, छोटे-मोठे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील बहुतांशी भागात शेतकरी शेतात नगदी पिकांचे उत्पादन घेत असतो. उत्पादित केलेला नगदी माल मंचर, नारायणगाव, पारगाव या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जातो.

जारकरवाडी येथे उत्पादित होणारा माल हा नारायणगाव या ठिकाणी देखील पाठवला जातो. मंचर मार्गे नारायणगावला जाण्यापेक्षा पारगाव मार्गे नारायणगावला जाणे जारकरवाडीतील शेतकऱ्यांसाठी सोपे आहे. साहजिकच बहुतांशी शेतकरी पारगाव मार्गे नारायणगावला जाण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र जारकरवाडी ते पारगाव हा वैदवाडी मार्गे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे.रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता खड्डे मुक्त कधी होणार?असा प्रश्न या मार्गाहून प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

संबंधित प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील स्थानिकांनी केली आहे.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.