जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे संपन्न झाला विद्यार्थ्यांचा सदिच्छा व गुणगौरव सोहळा!!


आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी ही शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असते. बोलक्या भिंती,दप्तरवीण शाळा,परिसर अभ्यास उपक्रम, डिजिटल शिक्षण पद्धती,CBSC अभ्यासक्रम,विविध स्पर्धा परीक्षा, मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित केले जाणारे विविध गुणदर्शन आदी उपक्रम शाळा नियमितपणे राबवत असते.मुलांना लहान वयातच व्यवहारज्ञान मिळावे यासाठी आठवडे बाजार देखील शाळा आयोजित करत असते.याशिवाय विद्यार्थ्यांत निकोप स्पर्धा तयार करण्यासाठी पालक,शाळा व विद्यार्थी यांचे नियमीत मेळावे देखील घेतले जातात.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला विविध प्रकारची झाडे सप्रेम भेट दिली. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पावभाजी चे जेवण देण्यात आले.

यावेळी चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या वेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय थोरात सर म्हणाले की,लहान मुले म्हणजे मातीचा गोळा असतात. त्यांना या वयात योग्य शिक्षण व संस्कार दिल्यास ते कायम स्वरुपी त्यांच्या जीवनात उतरत असतात. हल्लीचे जग हे स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धेत मुलांना टिकायचे असेल तर त्यांना शक्य तितके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षित करणे गरजेचे आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कधीच मागे पडत नाही.

निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल पाहता, तो राखण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. हाच धागा पकडून या चिमुकल्यांनी शाळेला झाडे सप्रेम भेट दिली असल्याचे सहशिक्षिका वैजयंता थोरात यांनी पंचनामा न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी आदर्श शिक्षक काळे सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ढोबळे, उपाध्यक्षा सविता ढोबळे,सर्व सदस्य,अंगणवाडी ताई लता लबडे, निर्मला पाचपुते उपस्थित होत्या.


